पुणे : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. जैन यांनी बुधवारी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. सेठ यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून बढती झाली आहे.

लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) माजी विद्यार्थी आहेत. ते जून १९८८मध्ये महार रेजिमेंटमध्ये रूजू झाले. ते महार रेजिमेंटचे कर्नलही आहेत. सुमारे चार दशकांच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध प्रकारच्या कार्यक्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मोहिमेतील तुकडीचे नेतृत्त्व केले आहे. तसेच स्ट्राइक कॉर्प्समधील तुकडी,  काउंटर-इन्सर्जन्सी फोर्स, उत्तर मुख्यालयातील पिव्होट कॉर्प्सचेही त्यांनी नेतृत्व केले आहे. ऑपरेशन पवनमध्ये त्यांचा सहभाग होता.

तसेच इथिओपियातील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये लष्करी निरीक्षक, तसेच नियंत्रण रेषेवरील आणि ईशान्य भारतातील उच्च उंचीवरील आणि दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची सेवा बजावली आहे. दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी दक्षिण मुख्यालयातच ‘चीफ ऑफ स्टाफ’ म्हणून काम केले आहे. दक्षिण क्षमतावृद्धी, दलाची पुनर्रचना आणि एकूण कार्यक्षमतेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी आर्मी वॉर कॉलेजमधील हायर कमांड कोर्स, केनियातील नॅशनल डिफेन्स कोर्स पूर्ण केला आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना ‘अति विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘सेना पदक’ देऊन गौरवण्यात आले आहे.

दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जैन यांनी युद्ध स्मारक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांना मुख्यालयात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ‘दक्षिण मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रातील विविध भौगोलिक क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात वाळवंट, खाडी, किनारपट्टी, बेट प्रदेशांचा समावेश आहे. या सर्व भागांमध्ये लष्कराच्या सज्जतेवर भर दिला जाणार आहे. संयुक्तता, स्वदेशी क्षमतावृद्धी, तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास बळ देण्यात येणार आहे. तसेच बदलत्या लष्करी आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवर उच्च दर्जाची तयारी, व्यावसायिकता आणि लढाऊ सज्जता राखणे महत्त्वाचे आहे,’ असे लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी सांगितले.

दक्षिण मुख्यालयाचे महत्त्व

लष्कराच्या रचनेमध्ये दक्षिण मुख्यालयाची स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दक्षिण मुख्यालय हे लष्कराचे सर्वांत जुने आणि सर्वांत मोठे क्षेत्रीय कार्यालय आहे. दक्षिण मुख्यालयाअंतर्गत ११ राज्ये, चार केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. देशाचा सुमारे ४१ टक्के भूभाग दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारित येतो.