पीटीआय, नवी दिल्ली

देशाचे पुढील संरक्षण दलप्रमुख (‘सीडीएस’) म्हणून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन. एस. राजा सुब्रमणी यांचे नाव निश्चित झाले आहे. देशाच्या सैन्यदलांची पुनर्रचना करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करणे आणि तिन्ही दलांमधील समन्वय वाढवणे या त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या असतील. याबरोबरच केंद्र सरकारने व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची पुढील नौदलप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सरकारने एका निवेदनामार्फत यासंबंधी माहिती दिली.

विद्यमान ‘सीडीएस’ जनरल अनिल चौहान हे ३० मे रोजी निवृत्त होत आहेत. त्याच दिवशी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुब्रमणी पदाची सूत्रे स्वीकारतील. ते लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने शनिवारी दिली. पाकिस्तान आणि चीनच्या विषयांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्याकडे ते गेल्या वर्षी जुलैला निवृत्त झाले, त्यावेळी ते लष्कर उपप्रमुख होते. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे (एनएससीएस) लष्करी सल्लागार आहेत.

आपल्या ४० वर्षांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल सुब्रमणी यांनी देशभरात विविध लढाया आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये कर्तव्य बजावले आहे. तसेच अनेक उच्चपदेही भूषवली आहेत. त्यांनी ब्रिटनच्या ब्रॅकनेलमधील जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, नवी दिल्लीचे राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय लष्करी अकादमीमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. ते १४ डिसेंबर १९८५ रोजी गढवाल रायफल्सच्या आठव्या बटालियनमध्ये रुजू झाले. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी यांना पश्चिम आणि उत्तर सीमांवरील लष्करी कारवायांची सखोल जाण आहे, असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

विद्यमान नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे ३१ मे रोजी निवृत्त होत असून त्याच दिवशी व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन पदभार स्वीकारतील. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख आहेत. नौदलप्रमुख म्हणून नौदलाचे आधुनिकीकरण करण्यावर व्हाइस ॲडमिरल स्वामीनाथन यांचा भर असेल. दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक युद्धनीतीचे तज्ज्ञ म्हणून ते १ जुलै १९८७ रोजी नौदलात रुजू झाले. त्यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी, ब्रिटनच्या श्रीव्हनहॅम येथील जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, कारंजाचे कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर, अमेरिकेच्या न्यूपोर्ट येथील यूएस नेव्हल वॉर कॉलेज या संस्थांमधून त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.

तिसरे संरक्षण दलप्रमुख

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे संरक्षण दलप्रमुख असतील. देशाचे पहिले ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांचा डिसेंबर २०२१मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर हे पद नऊ महिने रिक्त राहिल्यानंतर जनरल चौहान यांनी सप्टेंबर २०२२मध्ये संरक्षण दलप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. ते ३० मे रोजी निवृत्त होत आहेत.