गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ भारतात करोना ठाण मांडून बसला आहे. या काळामध्ये लाखो भारतीयांना करोनाची लागण झाली असून त्यात मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकीकडे देशात १०० कोटी लसीकरणाचा उत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे करोनामुळे भारतावर झालेल्या गंभीर परिणामाचा दाखला एका अभ्यासातून समोर आला आहे. करोना काळात अर्थात गेल्या साधारणपणे दोन वर्षांमध्ये देशातील नागरिकांचं सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी घटलं आहे. मंबईतल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फॉर पॉप्युलेशन स्टडीजनं अर्थात IIPS ने हा अभ्यास केला असून त्यांनी नुकताच आपला अहवाल जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या साथीचे देशभरातील मृत्यूदरावर कशा प्रकारे परिणाम झाले, याचा अंदाज घेण्यासाठी आयआयपीएसकडून हा अभ्यास करण्यात आला होता. या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक करोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे त्याचा देशाच्या सरासरी आयुर्मानावर काय परिणाम झाला, याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला. यासाठी ग्लोबल बर्डन डिसीज स्टडी आणि कोविड इंडिया अॅप्लिकेशन प्रोग्रामच्या पोर्टलवरून माहितीचा वापर करण्यात आल्याचं आयआयपीएसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दोन वर्षांनी आयुर्मान घटलं

या अभ्यासातील निष्कर्षांनुसार, करोना काळात देशातील सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी कमी झाल्यातं दिसून आलं आहे. त्यामुळे आता भारतातील सरासरी आयुर्मान हे २०१० मध्ये होतं, तितकं झाल्याचा दावा देखील संस्थेकडून करण्यात आला आहे. करोनाच्या आधी भारतातील सरासरी आयुर्मान पुरुषांसाठी ६९.५ वर्ष इतकं होतं. तेच आता ६७.५ वर्ष अर्थात दोन वर्षांनी घटल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे. त्यासोबरतच, महिलांसाठी जे आयुर्मान ७२ वर्ष होतं, ते आता ६९.८ वर्ष अर्थात २ वर्ष चार महिन्यांनी घटलं आहे.

Corona Updates in India : भारतात २४ तासात १६,३२६ नवे रुग्ण, मृतांच्या संख्येतही वाढ

याशिवाय, या अभ्यासातून हे देखील समोर आलं आहे की करोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या पुरुषांमध्ये प्रामुख्याने ३५ ते ६९ वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. सरासरी आयुर्मान घटण्यामध्ये या वयोगटात झालेले मृत्यू प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचं देखील या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

गेल्या १० वर्षांची मेहनत व्यर्थ

यासंदर्भात बोलताना आयआयपीएसचे सहाय्यक प्राध्यापक सुर्यकांत यादव म्हणतात, “गेल्या १० वर्षांत आपण देशवासीयांचं सरासरी आयुर्मान वाढवण्यासाठी जी काही प्रगती केली होती, ती सगळी करोना काळात धुवून निघाली आहे. आता २०१०मधल्या आयुर्मान पातळीवर आपण जाऊन पोहोचलो आहोत. आता पुन्हा आयुर्मान पूर्ववत करण्यासाठी आपल्याला अनेक वर्ष लागू शकतात”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life expectancy in india decline amid covid pandemic deaths pmw
First published on: 23-10-2021 at 11:50 IST