मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बलात्काराच्या एका प्रकरणात आरोपीची फाशी रद्द करुन त्याला मरेपर्यंत तुरुंगवास अर्थात आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बापानेच मुलीवर बलात्कार केल्याचं हे प्रकरण आहे. मुरुगन असं आरोपीचं नाव आहे. या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती रद्द करण्यात आली असून त्याला मृत्यूपर्यंत तुरुंगवास अशी शिक्षा देण्यात आली आहे.

Minor Rape
अल्पवयीन मुलीवर बलात्कार (फोटो – प्रातिनिधिक छायाचित्र)

न्यायालयाने निकाल देताना काय म्हटलं आहे?

न्यायाधीश आनंद व्यंकटेश आणि के. के. रामकृष्णन यांच्या दोन सदस्यीय पीठाने हा निर्णय दिला आहे. मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत तुरुंगवास ही फाशीपेक्षा मोठी शिक्षा आहे असं महत्त्वाचं मत न्यायालयाने हा निकाल देताना नोंदवलं आहे आणि आरोपीची फाशी रद्द करुन जन्मठेप कायम ठेवली आहे. आरोपीला आम्ही जाणीवपूर्वक जिवंत ठेवत आहोत. आपण काय केलं आहे, कुठला गुन्हा केलाय याची जाणीव त्याला रोज होत राहिल. त्यातून झालेला पश्चात्ताप त्याला सुखाने जगू देणार नाही. पीडित मुलीसाठी हाच खऱ्या अर्थाने न्याय ठरेल असं मद्राच उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटलं आहे. ७ एप्रिलला हा निकाल मदुराई खंडपीठाने दिला. न्यायालयाने निकाल देताना हे देखील स्पष्ट केलं आहे की मुलीवर बलात्कार करणारा आरोपी मुरुगन हा कोठडीत एकाकी आयुष्य जगतो आहे. कारण या घटनेनंतर त्याला समाजाने आणि त्याच्या कुटुंबाने वाळीत टाकलं आहे. तो पूर्णपणे एकटा पडला आहे. समाजानेही त्याच्यावर बहिष्कार घातला आहे. मुरुगनची ही स्थिती म्हणजे कुठलीही अडचण नाही. उलट त्याला मिळणारी ही कठोर शिक्षाच आहे. अशा स्थितीत त्याला जर फाशीची शिक्षा दिली तर रोज मिळणाऱ्या या शिक्षेतून त्याची सुटका होईल. त्याला मरेपर्यंत तुरुंगवास हीच शिक्षा योग्य आहे असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे आरोपीला कुठल्याही प्रकारची आगाऊ सुटका, शिक्षेतील सवलत किंवा यामध्ये कुठलाही बदल असं काहीही घडणार नाही. त्याला मृत्यूपर्यंत तुरुंगातच रहावं लागणार आहे ही बाबही न्यायालयाने अधोरेखित केली. Bar and Bench ने हे वृत्त दिलं आहे.

“मुलीवर बलात्कार करणारा आरोपी मुरुगन हा कोठडीत एकाकी आयुष्य जगतो आहे. कारण या घटनेनंतर त्याला समाजाने आणि त्याच्या कुटुंबाने वाळीत टाकलं आहे. तो पूर्णपणे एकटा पडला आहे. समाजानेही त्याच्यावर बहिष्कार घातला आहे. मुरुगनची ही स्थिती म्हणजे कुठलीही अडचण नाही. उलट त्याला मिळणारी ही कठोर शिक्षाच आहे. अशा स्थितीत त्याला जर फाशीची शिक्षा दिली तर रोज मिळणाऱ्या या शिक्षेतून त्याची सुटका होईल. त्याला मरेपर्यंत तुरुंगवास हीच शिक्षा योग्य आहे .”

मदुराई खंडपीठ, मद्रास उच्चन्यायालय

१४ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचं प्रकरण नेमकं काय?

मुरुगन या नराधमाने त्याच्या १४ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. मुलगी घरी एकटी आहे हे पाहून तो तिच्या एकटं असण्याचा गैरफायदा घेत होता. मुरुगनची पत्नी घरी नसताना त्याने त्याच्या १४ वर्षांच्या मुलीवर दोनपेक्षा जास्त वेळा बलात्कार केला. पीडितेने दिलेल्या साक्षीनुसार तिच्यावर मुरुगनने २० हून अधिक वेळा बलात्कार केला होता. तसंच याबाबत कुठे वाच्यता करशील तर याद राख असा दम तिला दिला होता. पीडितेच्या आईने तिच्यामध्ये होणारे शारिरीक बदल पाहिले तेव्हा तिला डॉक्टरांकडे तपासणीसाठी ती घेऊन गेली. ज्यानंतर मुलीने तिच्यावर काय अत्याचार झाले आहेत ते सांगितलं ज्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा ती पाच महिन्यांची गरोदर असल्याची बाब समोर आली. ज्यानंतर आईला तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला.

विशेष न्यायालयाने मुरुगनला सुनावली होती फाशीची शिक्षा

कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सदर मुलीचा गर्भपात करण्यात आला. DNA चाचणीत हे सिद्ध झालं की हे कृत्य नराधम मुरुगन यानेच केलं आहे. बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा (POCSO) नुसार एका विशेष न्यायालयाने मुरुगनाच्या या कायद्यातील कलम ६ च्या अंतर्गत बलात्कार आणि लैंगिक शोषणासाठी दोषी ठरवलं आणि ५ जानेवारी २०२६ या दिवशी त्याला फाशीची शिक्षा सुनावली. १४ वर्षांच्या मुलीवर मुरुगनने २० हून अधिक वेळा केलेला बलात्कार ही घटना मुलीच्या कोवळ्या वयावर आणि आयुष्यावर परिणाम करणारी आहे ही बाब नमूद करत या विशेष न्यायालयाने मुरुगनला फाशीची शिक्षा सुनावली. मुरुगनसारखा नराधम हा समाजासाठी हानिकारक आहे, स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जगण्याचा काही अधिकार नाही असं मत न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावताना नोंदवलं होतं. यानंतर जेव्हा हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाकडे गेलं तेव्हा त्यांनी मुरुगनची फाशी रद्द करुन त्याला मरेपर्यंत तुरुंगवास ही शिक्षा सुनावली. त्याला समाजाने, कुटुंबाने बहिष्कृत केलं आहे. अशा अवस्थेत जिवंत राहणं, एकाकी राहणं हीच त्याच्यासाठी मोठी शिक्षा आहे असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.