Factory Milk From Detergent Powder and Urea : तुमच्याकडे रोज येणारं दूध हे खरंच दूध आहे की डिटर्जंट पावडरमध्ये मिक्स केलेलं रसायन आहे याची एकदा खात्री करून घ्या. कारण, एका अशा कारखान्यात गुन्हे शाखेने धाड टाकली आहे जिथे डिटर्जंट पावडर, युरिया आणि इतर विषारी रसायनांनी मिसळलेले दूध आणि ताक बनवलं जात होतं. हे असं भेसळयुक्त दूध पिणं आरोग्याला फक्त हानीकारकच नसून जीवघेणंही ठरू शकतं. गुजरातमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून तब्बल पाच वर्षे साबरकांठा आणि मेहसाणा जिल्ह्यातील शेकडो गावकरी हे दूध पित होते. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

शुक्रवारी साबरकांठा स्थानिक गुन्हे शाखेने प्रांतीज तालुक्यातील सलाल गावाजवळ भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या कथित कारखान्याचा पर्दाफाश केला आणि एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना अटक केली. श्री सत्य डेअरी प्रॉडक्ट्स नावाच्या युनिटवर हा छापा टाकण्यात आला आहे. येथे पाणी, दूधाची पावडकर, कॉस्टिक सोडा, रिफाइंड पामोलिन ऑइल, रिफाइंड सोयाबीन तेल, डिटर्जंट पावडकर आणि युरिया खत मिसळून दूध तयार केले जात होतं.

भेसळयुक्त दूध कसं तयार केलं जातं?

३०० लीटर चांगल्या दूधात विविध रसायने मिसळून दररोज १७०० ते १८०० लीटर दूध तयार केलं जात होतं. हे दूध पाऊचमध्ये पॅक करून गावांमध्ये विकलं जात होतं, असा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. या छाप्यादरम्यान पोलिसांनी ४५० किलो व्हे पावडर, ६२५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ३०० किलो प्रीमिअम एसएमपी पावडर, युरिया खत, कॉस्टिक सोडा, डिटर्जंट पावडर, सोयाबीन तेल आणि पामोलिन तेल यासह भेसळयुक्त साहित्य जप्त केले. तसंच, वितरणासाठी १ हजार ९६२ लीटर भेसळयुक्त दूध आणि ११८० लीटर भेसळयुक्त ताक जप्त केलं.

ग्राहकांची दिशाभूल करण्याकरता दूधाची जाडी, फेस, प्रथिनांचे प्रमाण आणि एकूण स्वरुप कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी भेसळयुक्त पदार्थांचा वापर केला जात होता. विशिष्ट गुप्त माहितीच्या आधार स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज आणि अन्न व औषध विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. झडती दरम्यान अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घातक रसायने भेसळयुक्त पदार्थ आणि दूध उत्पादन आणि पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे उपकरणे जप्त केली आहेत. तर, करखाना सील करण्यात आलाय.

कर्मचारी अटकेत, मालक फरार

पोलिसांनी प्लांट ऑपरेटर जितेंद्र पटेल आणि कर्मचारी सचिन मकवाना, करण परमार आणि अजयसिंह परमार या चार आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन बालकामगारालाही ताब्यात घेतलं आहे. कालखान्याचा मालक राकेश उर्फ धामो पटेल, याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.