मुंबई : भारतामध्ये असंसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण हे सध्या सार्वजनिक आरोग्यासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब आणि श्वसनविकार यांसारखे आजार देशातील मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमुख कारण बनत असून, बदलती जीवनशैली आणि शहरीकरण यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

पूर्वी संसर्गजन्य रोग हे मृत्यूचे मुख्य कारण मानले जात होते. मात्र गेल्या दोन दशकांत जीवनशैलीशी संबंधित आजारांनी वेगाने वाढ घेतली आहे. विशेष म्हणजे, या आजारांचे प्रमाण आता ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अलीकडील अभ्यासानुसार, देशात सुमारे १० कोटींहून अधिक नागरिक मधुमेहाने ग्रस्त असून जवळपास १३ कोटी लोक प्री-डायबेटिक अवस्थेत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे तरुणांमध्येही मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

तज्ज्ञांच्या मते ४० वर्षांखालील लोकांमध्ये जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण पूर्वीपेक्षा दुपटीने वाढले आहे. कर्करोगाच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत आहे. प्रदूषण, तंबाखू सेवन, अयोग्य आहार आणि मानसिक ताण ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. आरोग्य अभ्यासानुसार, भारतातील प्रत्येक नऊपैकी एक व्यक्ती दीर्घकालीन असंसर्गजन्य आजाराशी झुंजत आहे. महाराष्ट्रासारख्या वेगाने शहरीकरण होत असलेल्या राज्यांमध्ये ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

असंसर्गजन्य आजारांचा आर्थिक परिणामही मोठा आहे. दीर्घकालीन उपचार, औषधोपचार आणि कामकाजातील घट यामुळे कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम

शहरी भागातील बैठी जीवनशैली, दीर्घ कामाचे तास आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा वाढत असून तो अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत आहे. वाढते वायू प्रदूषण, फास्ट फूडचे वाढते सेवन आणि झोपेची कमतरता हीदेखील महत्त्वाची कारणे मानली जात आहेत.

आळा घालणे शक्य

केंद्र आणि राज्य सरकारांनी आरोग्य तपासणी मोहीम, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि जीवनशैली सुधारणा अभियान सुरू केले असले तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय या संकटावर नियंत्रण मिळवणे कठीण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताण नियंत्रण आणि वार्षिक आरोग्य तपासणी यांचा अवलंब केल्यास या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.