एपी, पॅरिस
फ्रान्समध्ये एका आठवड्यात ३५ तास कामाचा मर्यादा निश्चित करणारे माजी पंतप्रधान लिओनेल जोस्पिन यांचे रविवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. जोस्पिन १९९७ ते २००२ या कालावधीत फ्रान्सचे पंतप्रधान होते. त्यांनी सोशालिस्ट पार्टीच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली होती. पंतप्रधान सेबास्तियन लेकोर्नू यांनी जोस्पिन यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.
जोस्पिन हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. १९८१मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वाँ मितराँ यांनी अनपेक्षितपणे सोशालिस्ट पार्टीच्या अध्यक्षपदासाठी जोस्पिन यांचे नाव सुचवले. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बेजार झालेल्या सोशालिस्ट पार्टीला १९९३च्या पार्लमेंट निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. खुद्द जोस्पिन यांची प्रतिमा स्वच्छ होती, त्यांनी पुन्हा एकदा पक्षाची विश्वसनीयता प्रस्थापित केली आणि १९९७च्या पार्लमेंट निवडणुकीत पक्षाला सत्ता मिळवून दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्समध्ये डाव्या विचारसरणीचे सरकार सत्तेत होते आणि अध्यक्षपदी परंपरावादी जॅक शिराक हे होते. मात्र, दोन्ही नेत्यांनी सांमजस्याने सत्तावाटप केले.
पंतप्रधान असताना जोस्पिन यांना फ्रान्समधील अर्थव्यवस्थेत मुक्त बाजारपेठ स्वीकारणाऱ्या सुधारणा घडवण्यासाठीही श्रेय दिले जाते. जोस्पिन २००२मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिले होते. पण जीन-मेरी ले पेन यांच्या अतिउजव्या नॅशनल फ्रंटने त्यांच्यावर आघाडी घेतली. त्यानंतर जोस्पिन यांनी राजकारणाला रामराम ठोकला.
जोस्पिन यांनी सातत्याने काटेकोरपणे आणि जबाबदारीचे भान राखून फ्रान्सचे नेतृत्व केले. सामाजिक प्रगती आणि प्रजासत्ताक मूल्यांचा दृष्टीकोन बाळगून त्यांनी ज्या कृती केल्याचा त्याचा फ्रान्सवर दीर्घकाळ ठसा उमटला. – सेबास्तियन लेकोर्नू, पंतप्रधान, फ्रान्स
महत्त्वाचे निर्णय
जोस्पिन यांनी फ्रान्समध्ये पॅरिटी कायदा लागू केला. यामुळे राष्ट्रीय निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्षांना समान संख्येने स्त्री आणि पुरुषांना उमदेवारी देणे अनिवार्य झाले. त्यांनी आठवड्याचे कामाचे तास ३९वरून ३५वर आणले. समर्थकांनी या निर्णयाचे सामाजिक प्रगतीतील मोठा टप्पा म्हणून स्वागत केले. तर विरोधकांनी यामुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत खीळ बसेल अशी टीका केली. ‘एलजीबीटीक्यू’साठी नागरी संघटना निर्माण करण्यात आले.
