जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मद्य विक्रीवरुन जे एक विधान केलं आहे त्यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध विरोधक करत आहेतच. पण त्यांच्या पक्षातून म्हणजेच नॅशनल कॉन्फरन्समधूनही या वक्तव्याचा निषेध केला जातो आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेऊ.

ओमर अब्दुल्लांना विचारला गेलेला प्रश्न आणि उत्तरामुळे झालेला वाद

२०२६ च्या मद्यधोरणाबाबत ओमर अब्दुल्लांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ओमर अब्दुल्ला म्हणाले की जे लोक आपल्या मर्जीने मद्यपान करतात त्यांना कसं अडवणार? शिवाय सरकार कुणालाही मद्याच्या दुकानात जाण्यासाठी भाग पाडत नाही. हे उत्तर ओमर अब्दुल्लांनी दिलं आणि त्यावरुनच वाद निर्माण झाला. ज्यांचा धर्म मद्यपान करण्याची संमती देतो त्यांनी काश्मीर मध्ये मद्यपान केल्यास आम्ही त्यांना कशाला अडवू? असंही अब्दुल्ला म्हणाले ज्यावरुन हा वाद पेटला आहे. तसंच जम्मू काश्मीरमध्ये सरकारने मद्याची दुकानं बंद केलेली नाहीत असंही ते म्हणाले. ज्यानंतर पीडीपीकडून आणि त्यांच्या पक्षातूनही या उत्तराचा निषेध नोंदवण्यात आला.

Omar Abdullah Statement
ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यामुळे वाद (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

बारामुल्लाचे खासदार आगा सय्यद मेहदी काय म्हणाले?

ओमर अब्दुल्लांनी मद्य विक्री बाबत केलेलं वक्तव्य हे अहंकाराने भरलेलं आहे. त्यांच्या उत्तरात कुठलाही तर्क नाही. विधानसभा निवडणूक पार पडली तेव्हा त्यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी जी मद्य विक्रीची दुकानं उघडली गेली आहेत ती बंद करण्यात येतील. आता सत्ता मिळाल्यावर त्यांना त्यांच्याच आश्वासनचा विसर पडला. अशी टीका ओमर अब्दुल्लांच्या पक्षातील खासदारानेच केली आहे.

मुख्यमंत्री ओमर अब्दुलांची भाषा गर्वाने भरलेली

यानंतर खासदार मेहदी म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मद्य धोरणाबाबतच्या प्रश्नावर जे उत्तर दिलं त्यात एका अर्थाने गर्व होता. अशा प्रकारची भाषा भाजपाचे लोक करतात, आज तशीच भाषा ओमर अब्दुल्ला बोलत आहेत ही बाब दुर्दैवी आहे. काश्मीरमधल्या लोकांसाठी ही भाषा आता वापरली जाते आहे तीदेखील मुख्यमंत्री अब्दुल्ला यांच्याकडून. मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य हे पक्षाच्या धोरणाच्या विरोधातलं आहे. मद्य विक्रीच्या दुकानांबाबत सरकारची जी नीती आहे त्याचा त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. हे लोक आता मद्य धोरणाला चालना देत आहेत. आता असं सांगितलं जातं आहे की तुमचा धर्म संमती देत असेल तर मद्य पिऊ शकता.” असं म्हणत खासदाराने टीका केली आहे.

पीडीपीचे नेते इल्तिजा मुफ्ती काय म्हणाले?

पीडीपीचे नेते इल्तिजा मुफ्ती यांनीही ओमर अब्दुलांवर टीका केली आहे. सरकारने मद्य धोरणावरुन आता पूर्णपणे यू टर्न घेतल्याचं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. मद्य विक्रीच्या धोरणावर जे वक्तव्य ओमर अब्दुल्लांनी केलं आहे त्याला काहीही अर्थ नाही. कुठल्याही धर्मात अल्कोहोल किंवा ड्रग्ज घ्या असं सांगितलेलं नाही. इस्लाम असो, शिख धर्म असो किंवा हिंदू धर्म कुठल्याही धर्मात मद्य प्या असं काही सांगण्यात आलेलं नाही. अशात ओमर अब्दुल्लांनी केलेलं विधान निषेधार्ह आहे.

ओमर अब्दुल्लांनी या वादावर काय म्हटलं आहे?

या वादानंतर ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकरणात असंही म्हटलं आहे की जम्मू काश्मीरमध्ये मद्यविक्रीची नवी दुकानं उघडलेली नाहीत. तसंच सरकारने मद्य विक्रीवर पूर्णपणे निर्बंध घातलेले नाहीत. सरकार यावर लक्ष ठेवून आहे की मद्य विक्रीची ही दुकानं अशा ठिकाणी नकोत जिथे तरुणांना मद्य सहज उपलब्ध होईल आणि ते चुकीच्या मार्गाला जातील. युवकांना या दुकांनापासून दूर ठेवण्याचा सरकारचा मानस आहे असंही ओमर अब्दुल्लांनी म्हटलं आहे.

कशी आहे ओमर अब्दुल्लांची राजकीय कारकीर्द?

ओमर अब्दुल्ला यांनी १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये श्रीनगर मतदारसंघातून निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.

ओमर अब्दुल्लांनी २००२ मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला.

२००९ मध्ये ते जम्मू-काश्मीरचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री बनले आणि २०१५ पर्यंत या पदावर होते.

ओमर यांचे वडील फारुख अब्दुल्ला तसेच आजोबा शेख अब्दुल्ला हे दोघेही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

ओमर अब्दुल्ला यांचे शिक्षण श्रीनगरच्या Burn Hall School मध्ये झाले, नंतर त्यांनी मुंबईतील Sydenham College of Commerce मधून बीकॉम पूर्ण केले आणि स्कॉटलंडच्या University of Strathclyde येथून MBA केले.