भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांडपंडित होते. त्यांचा विविध विषयांवरचा व्यासंग अफाट होता. त्यांनी अनेक विषयांवर मूलभूत चिंतन केले. त्यातून अनेक अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथसंपदेची निर्मिती झाली. या ग्रंथसंपदेतूनच त्यांची सर्वसमावेशक आणि समन्यायी अशी वैचारीक भूमिका स्वयंस्पष्ट होते. त्यांच्या ग्रंथांचा संक्षिप्त आढावा या लेखात घेण्यात आला आहे.

Administration and Finance of the East India Company (ईस्ट इंडिया कंपनी प्रशासक आणि अर्थनीती) – डॉ. बाबासाहेबांनी अॅॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स ऑफ दि इस्ट इंडिया कंपनी हा शोधनिबंध, एम.ए.च्या पदवीसाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला इ.स १९१५  मध्ये सादर केला होता. हा केवळ ४२ पृष्ठांचा शोधनिबंध होता. डॉ. बाबासाहेबांनी इ.स.१७१२ ते १८५८ या कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार आणि वित्त या संदर्भातील धोरणांची बदलाचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे.  हे बदल भारतीयांच्या हालअप्तेष्टांना कसे कारणीभूत ठरले याचे विदारक आर्थिक स्थितीचे स्वरुप या प्रबंधात मांडले आहे.

सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ आता मोडी लिपीत
पनामा कालवा: अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडणारा अभियांत्रिकी शास्त्राचा उत्कृष्ट नमूना
महाराष्ट्र शासनाची अधिपरिचारिका पदासाठी स्पर्धा परीक्षा- २०१८
ambedkar contributions to indian economics
अग्रलेख : अर्थचक्रप्रवर्तन
Castes in India : Their Machanism, Genesis and Development ( भारतातील जातिसंस्था तिची यंत्रणा उत्पत्ती आणि विकास)- १९१६ सालच्या मे महिन्यात अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्रा.ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मानववंशशास्त्राच्या परिषदेत डॉ. बाबासाहेबांनी  कास्ट्स इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अॅन्ड डेव्हलपमेंट या विषयावर आफला संधोधनात्मक निबंध वाचला.  त्यात त्यांनी स्पष्ट केले की, आपल्याच जातीत विवाह करणे हा जातिसंस्थेचा प्राण मानलेला आहे.
The National Dividend of India a Historical and Analytical Study (ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती)-  डॉ. बाबासाहेबांनी भारताच्या आर्थिक प्रश्नांवर सखोल अभ्यास करुन The National Dividend of India a Historical and Analytical Study ( भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा ) हा एक ऐतिहासीक पृथक्करणात्मक प्रबंध लिहून पूर्ण केल्यानंतर तो १९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. या प्रबंधावर यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली.
Federation Versus Freedom (संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य) – पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट  ऑफ पॉलिटीक्स’ या संस्थेच्या वार्षिक समारंभात गोखले सभागृहातील काळे स्मृती व्याख्यानमालेत २९ जानेवारी १९३९ रोजी डॉ. बाबासाहेबांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी त्यांनी ‘फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम’ या विषयावर आपले विचार प्रकट केले.

The Problem of the Rupee – Its Origin and its Solution(रुपयाचा प्रश्न – उद्गम आणि उपाय)- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एस. सी.) या अत्युच्च पदवीसाठी प्रा. एडविन कॅनन यांच्या अनुमतीने ‘दि प्रॉब्लेम ऑफ दि रुपी – इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन’ हा प्रबंध १९२२ साली ऑक्टोबर महिन्यात लंडन विद्यापीठाला सादर केला. या ग्रंथात त्यांनी भारतीय चलनाची उत्क्रांतीची ऐतिहासिक मीमांसा करून भारतासाठी आदर्श चलन पद्धती कोणती? या त्या काळातील महत्वाच्या प्रश्नावर आपले मूलगामी विचार मांडले आहेत.

Pakistan or The Partition of India(पाकिस्तान अथवा भारताची फाळणी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम १९४० च्या डिसेंबर महिन्यात थॉट् ऑन (पाकिस्तान पाकिस्तान अथवा भारताची फाळणी) हा अत्यंत महत्वाचा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून प्रकाशित केला. याच ग्रंथाची सुधारित आवृत्ती पुढे १९४५ साली प्रकाशित करण्यात आली. सुधारित आवृत्तीचे शिर्षक ‘पाकिस्तान ऑर दि पार्टीशन ऑफ इंडिया’ असे होते. या ग्रंथाची प्रथम आवृत्ती होय. हा ग्रंथ थॅकर अँड कंपनी लि. मुंबई या संस्थेने प्रकाशित केला.

Annihilation  of Castes (जातीचे निर्मूलन) – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ मध्ये जातपात तोडक मंडळाद्वारा लाहोर येथे होणा-या अधिवेशनात आपले विचार मांडण्यासाठी तयार केलेला अध्यक्षीय भाषणाचा मसुदा मंडळाच्या रिवाजाप्रमाणे जातपात तोडक  मंडळाकडे अनुमतीसाठी पाठवला. पुढे तो पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आला. 

Ranade,  Gandhi And Jinnah  (रानडे गांधी आणि जिन्ना)- दि. १८ जानेवारी १९४२ रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त भारतसेवक समाज या संस्थेने गोखले मेमोरियल सभागृहात आयोजित केलेल्या समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रमुख वक्ते म्हणून डेक्कन सभा ऑफ पुणे या संस्थेने आमंत्रित केले होते. त्या प्रसंगी त्यांनी ‘रानडे, गांधी आणि जिन्ना’ या विषयावर प्रदीर्घ असे तात्विक व्याख्यान दिले होते.

Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables (गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती) – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४२ साली हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या प्रश्नांसंबंधी विचार प्रदर्शित करणारा प्रबंध इन्स्टिट्यूट ऑफ पॅसिफिक रिलेशन्स या संस्थेकडे पाठविला होता. त्यावर चर्चा होऊन तो प्रबंध अधिवेशनाच्या अहवालात छापला होता. पुढे हा प्रबंध ‘गांधी अँड दी इमॅन्सिपेशण ऑफ दी अनटचेबल्स’ (गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती /गांधी आणि अस्पृश्य वर्गाचे विमोचन) या नावाने डिसेंबर १९४३ मध्ये थॅकर अॅन्ड कंपनी लिमिटेड, मुंबई यांनी पुस्तकरूपात प्रकाशित केला.

Communal Deadlock and a way to Solve it (जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग) – दी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे ६ मे १९४५ रोजी मुंबई नरेपार्कवर आयोजित केलेल्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राष्ट्रीय दृष्टीकोनातून भूमिका विशद केली. त्यात त्यांनी भारतीय राजकारणातील जातीय पेचप्रसंग आणि त्यातून मार्ग काढणे या व इतर मुद्यांवर आपली मते प्रदर्शित केली. याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणाची एक लिहिलेली प्रत तयार केली होती. ती पी. अॅन्ड ओ प्रिंटींग प्रेस दिल्ली येथे १९४५ मध्ये छापून घेतली.

What Congress and Gandhi have done to the Untouchables (काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?) – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४५ च्या जून महिन्यात प्रसिद्ध केलेला हा एक महान वैचारिक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाच्या नावात ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्याचे किती नुकसान केले? असाच गर्भीत अर्थ निघतो. हा गर्भित अर्थ सिद्ध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब या ग्रंथात विपुल माहिती व आकडेवारी दिली आहे. त्यांच्या आधाराने त्यांनी काँग्रेस आणि गांधी यांच्या राजकीय, सामाजिक धार्मिक व आर्थिक योजनासंबंधी चिकित्सक व टीकात्मक विचारसरणीने प्रकाश टाकला आहे.

States and Minorities- What are their rights and how to secure them in the constitution Free India(संस्थाने आणि अल्पसंख्याक)- संस्थाने आणि अल्पसंख्याक जाती यांचे हक्क कोणते आणि ते स्वतंत्र भारताच्या संविधानात प्रविष्ट कसे करून घेता येतील या विषयी शेड्यूल्ड कास्टस् फेडरेशनतर्फे घटना समितीस सादर केलेला अस्पृश्यांच्या हितसंरक्षक तरतुदीचा खलिता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मूळ इंग्रजीतील निवेदन घटना समितीला सादर केले. ते ‘फ्रेमिंग ऑफ इंडियाज कॉन्स्टीट्यूशन’ या ग्रंथाच्या पृष्ठ ८४ ते ११४ पानावर छापण्यात आले होते. पुढे हे निवेदन डॉ. बाबासाहेबांनी पुस्तकरूपाने मार्च १९४७ मध्ये थॅकर अॅन्ड कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्याद्वारे प्रकाशित केले.

Maharashtra as a Linguistic Province (महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत) – महाराष्ट्र अॅज लिंग्विस्टिक प्रोविअन्स हे पुस्तकरूपाने ऑक्टोबर १९४८ मध्ये थॅकर अॅन्ड कंपनी लिमिटेड मुंबई या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले. मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे प्रा.बी. सी. कांबळे यांनी मराठीत भाषांतर करून प्रसिद्ध केले होते. महाराष्ट्र एक भाषिक प्रांत या विषयी विचार मांडतांना डॉ. बाबासाहेबांनी भाषावार प्रांतरचनेच्या समस्या महाराष्ट्र हा व्यवहार्य प्रांत होईल का? महाराष्ट्र प्रांत हा एकच असावा कि, संघराज्य असावा व महाराष्ट्र आणि मुंबई शहर या चार भागात विवेचन केले आहे.

The rise and fall of Hindu Women (हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती)- डॉ. बाबासाहेबांचा हा वैचारिक व सांस्कृतिक लेख प्रथम कोलकात्याच्या ‘महाबोधी’ मासिकाच्या मे व जून १९५१ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. नंतर ‘ द राईज अॅन्ड फॉल ऑफ हिंदू वूमन’ हे संशोधनात्मक वैचारिक लेखन १९६५ साली डॉ. आंबेडकर पब्लिकेशन सोसायटी या प्रकाशन संस्थेने पुस्तक रूपाने प्रकाशित केले.

Who were the Shudras? How they came to be the Fourth Varna in Indo-Aryan Varna Society(शुद्र पूर्वी कोण होते?) – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘हू वेअर शूद्राज? हाऊ दे केम टू बी द फोर्थ वर्णा इन द इंडो आर्यन सोसायटी’ हा ग्रंथ १९४६ मध्ये प्रसिद्ध झाला. या संशोधनात्मक ग्रंथाचा शूद्र हे पूर्वी क्षत्रिय होते हा या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय असून पूर्व काळात त्यांना दास व दस्यू म्हणत. सुर्यवंशापैकी तो एक समाज होता. त्याचा ब्राह्मणांशी संघर्ष झाल्यामुळे समाजातील त्यांचा दर्जा कमी झाला. कारण ब्राह्मणांनी त्यांचे मौजीबंधन करण्याचे नाकारले. त्यामुळे त्यांना चौथा वर्णातील मानण्यात आले. त्यापूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे तीनच वर्ण होते. हिंदू समाजातील चौथा वर्ण शुद्र कसा व केव्हा उत्पन्न झाला हा आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी आणि या संबंधित जगातील समाज शास्त्रज्ञांची जी मते आहेत ती खरी नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी अनेक उत्तम व सत्यसंदर्भ आपल्या ग्रंथासाठी वापरले आहेत.

The Riddles in Hinduism (हिंदू धर्मातील कोडे) – इ.स. १९५१ ते १९५६ या वर्षाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्ध अॅन्ड हिज धम्म (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म) रिव्होलेशन अॅन्ड काऊंटर रिव्होलेशन इन इंडिया (क्रांती आणि प्रतिक्रांती) बुद्ध अॅन्ड कार्लमार्क्स, दि रिडल्स ऑफ हिंदूझम (हिंदू धर्माचे कोडे) या ग्रंथाचे लेखन चालू होते. दी रिडल्स ऑफ हिंदूइझम या ग्रंथाच्या लेखनमालेची सुरुवात १९५४ मध्ये केली व सप्टेंबर १९५६ मध्ये लिहून पूर्ण केला. परंतु त्यात फेरफार करणे व शेवटची प्रत तयार करण्याचे काम अपूर्ण राहिले.

Thoughts on Linguistic States (भाषिक राज्यासंबंधी विचार) – डॉ. बाबासाहेबांनी ‘थॉटस् ऑन लिंग्विस्टिक स्टेटस्’ हे पुस्तक नागसेन बन औरंगाबाद येथे लिहून प्रकाशित केले. यात एकूण पाच भाग व अकरा प्रकारणे आहेत आपले विचार स्पष्ट करण्यासाठी पाच नकाशे व प्रमुख जातीची आकडेवारीचे परिशिष्ट जोडले आहे.

The Pali Grammar, Dictionary and Bouddha Pooja Patha(पाली व्याकरण, शब्दकोश आणि बौद्ध पुजापाठ) – Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches-Vol-16 Gramma and Dictionary of the Pali Language- by Dr. B.R. Ambedkar. हा ग्रंथ बराच काळ अप्रकाशित होता. महाराष्ट्र शासनाने १९९८ साली हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र साहित्य प्रकाशन समितीमार्फत प्रकाशित करण्यात आला. त्या वेळी महाराष्ट्र शासनाचे विशेष पदाधिकारी व बाबासाहेबांच्या साहित्याचे अभ्यासक वसंत मून हे होते. त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक हा ग्रंथ संपादित केला आहे. या ग्रंथाच्या संदर्भात वसंत मून यांनी संपादित केलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मप्रवास’ १९८९ या पुस्तकात महत्वाचा उल्लेख केला आहे. या ग्रंथात पाली व्याकरणाची माहिती समाविष्ट आहे. त्याचबरोबर शब्दकोश देण्यात आला आहे. बौद्ध पूजापाठ याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

Revolution and Counter Revolution (क्रांती आणि प्रतिक्रांती) – क्रांती आणि प्रतीक्रांती हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात डॉ. बाबासाहेबांनी बौद्धधर्माच्या भारतात झालेल्या उदयाला ‘क्रांती’ मानले असून ब्राह्मणी धर्माने त्याविरुद्ध ज्या मार्गाचा अवलंब केला त्याला ‘प्रतिक्रांती’ मानले. या प्रतीक्रांतीचा जो परिणाम झाला तो म्हणजे बौद्धधर्माची अवनती किंवा ऱ्हास होय. या दोन्ही ऐतिहासिक घटना कशा घडल्या त्यामागे नेमकी कोणती कारणे होती याची कारणमीमांसा करण्याच्या हेतूने, डॉ. बाबासाहेबांनी या ग्रंथाची निर्मिती केली.

Buddhism and Communism(बौद्धधम्म आणि साम्यवाद)- १५ नोव्हेंबर १९५६ रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट कॉन्फरन्स’ ची (बौद्धभ्रांतृ संघाची जागतिक परिषद) परिषद भरली होती. संयोजकांच्या आमंत्रणानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेला उपस्थित राहिले होते. २० नोव्हेंबर १९५६ रोजी या परिषदेत त्यांनी ‘बौद्धधर्मातील अहिंसा’ Buddhism and Communism या विषयावर व्याख्यान देण्याचे ठरवले होते. परंतु बहुसंख्य प्रतिनिधींनी ‘बुद्ध आणि साम्यवाद’ या विषयावर बोलण्याचा आग्रह धरला. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असे विस्तृत व्याख्यान दिले. या व्याख्यानाने सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले. पुढे बाबासाहेबांच्या या व्याख्यानात मांडलेले विचार बुद्धिझम अॅन्ड कम्युनिझम या नावाने प्रकाशित करण्यात आले.

The Buddha and His Dhamma(भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म)-या ग्रंथाची आठ खंडात विभागणी केली आहे. पहिल्या खंडात सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले? दुसऱ्या खंडात धम्मदीक्षेची मोहीम, तिसऱ्या खंडात भगवान बुद्धांनी काय शिकवले? यात धम्म, अधम्म व साद्धम्म म्हणजे काय याचे विवरण. चौथ्या खंडात धर्म व धम्म पुनर्जन्म, कर्म, बुद्धांची प्रवचने, पाचव्या खंडात संघ, भिक्खूचे कर्तव्य, भिक्खू आणि उपासक, उपसकासाठी नियम तर सहाव्या  खंडात भगवान बुद्धांचे समर्थक, त्यांचे विरोधक आणि बौध्दधम्माचे टीकाकार. सातव्या खंडात भगवान बुद्धांचे भ्रमणीकांची अंतिम यात्रा-वैशालीचा निरोप व महापरिनिर्वाण आणि आठव्या खंडात भगवान बुद्धांचे व्यक्तिमत्व व उपसंहार इत्यादी विषयांच्याद्वारा भगवान बुद्धांचा जन्म, गृहत्याग, संबोधीप्राप्ती, धम्मचक्र प्रवर्तन, धम्मप्रचार, बौद्धधम्माचे तत्वज्ञान आणि महापरिनिर्वाणापर्यंत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या संदर्भातील प्रचलित असलेल्या पारंपारिक मतप्रणालीला धक्का देणारे क्रांतिकारी विचार प्रस्तुत केले आहेत. त्यामुळे हा ग्रंथ अंधश्रद्धेने पठण करावयाचा धर्मग्रंथ नव्हे, तर तो ज्या बुद्ध वचनाच्या आधारे डॉ. बाबासाहेबांनी लिहीला आहे, ती वचने भगवान बुद्धांच्या विचारांची बुद्धिनिष्ठा, तर्कसंगती, अनुभवप्रामाण्य, बहुजनांची कळकळ इ. निकषांवर आधारित आहेत.

बौद्धधम्माच्या अभ्यासकांनाही प्रस्तुत ग्रंथ हा त्या धर्मतत्वज्ञानावरील इतर पारंपरिक ग्रंथापेक्षा वेगळा असल्याची जाणीव होऊन बौद्धधम्माबद्दल नवीन दृष्टी प्राप्त होईल. असा मौलिक ग्रंथ त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात आपली निष्ठा आणि परिश्रम पणाला लावून लिहिला. या ग्रंथाची पूर्ती म्हणजे त्यांची वाचनपूर्तीच होती. म्हणून ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ म्हणजे सर्वश्रेष्ठ साहित्यकृती, ग्रंथसंपदा मानली जाते.

(लोकराज्यच्या एप्रिलच्या अंकातून साभार, लेखक – डॉ. संदेश वाघ,  सहयोगी प्राध्यापक, इतिहास विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई )