Supreme Court Uproar as petitioner abuses CJI: भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावल्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट रुममध्ये गोंधळ झाला आहे. शुक्रवारी एका याचिकाकर्त्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना याचिकाकर्त्याने न्यायाधीशांच्या दिशेने कागद भिरकावले आणि सरन्यायाधीशांबद्दल अश्लील शिवीगाळ केली. याचिकाकर्त्याचा बदललेला नूर पाहून सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ बाहेर काढले, त्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला.

शुक्रवारी न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर प्रबल प्रताप नावाच्या याचिकाकर्त्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. खंडपीठासमोर हजर होताच न्यायाधीशांनी विचारले, तुम्ही स्वतः पक्षकार आहात का? श्री प्रबल प्रताप? यावर होकारार्थी उत्तर देत याचिकाकर्त्याने खंडपीठालाच आदेश देण्यास सुरुवात केली.

याचिकाकर्ता म्हणाला, “माननीय न्यायिक सेवक, मी तुम्हाला आदेश देतो की, तुम्ही लखनौच्या विकासनगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत.”

याचिकाकर्त्याच्या या अजब कथनावर न्यायमूर्ती विश्वनाथन म्हणाले की, तुम्ही मला आदेश देत आहात? तुम्ही मला आदेश देत आहात?

न्यायाधीशांच्या प्रश्नावरही याचिकाकर्ता पुढे बोलत राहिला. त्याने एका कंपनीचे नाव घेऊन ती देशभरात सायबर क्राइमची टोळी चालवत असल्याचा आरोप केला. त्यानंतर तो पुढे म्हणाला, “माझ्याकडून इतकेच. फाईलच्या १५५ पानांमध्ये सर्व काही माहिती नमूद आहे.” यानंतर अचानक त्याने फाईलमधून कागदपत्रांचा गठ्ठा बाहेर काढला आणि माझ्याकडे ही काही कागदपत्रे आहेत, असे सांगून ती हवेत उडवली. ही कागदपत्रे सरन्यायाधीशांना द्यावीत, असे सांगून त्याने शिवीगाळही केली.

यानंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत याचिकाकर्त्याला बाहेर काढले.

भूषण गवई यांच्यावर बूट फेक

मागच्या वर्षीय ६ ऑक्टोबर रोजी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. ही वस्तू सरन्यायाधीशांना लागली नाही. या घटनेनंतरही सरन्यायाधीशांनी न्यायालयाचे कामकाज सुरूच ठेवले होते. खजुराहो येथील विष्णू मूर्तीच्या पुनर्स्थापनेची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी केलेल्या कथित विधानामुळे नवल किशोर नाराज होते.

या घटनेनंतर भूषण गवई यांनी नवल किशोर यांच्याविरोधात तक्रार करणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने नवल किशोर यांचे नाव नोंदणीवरून काढले. तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने पुढील कार्यवाहीपर्यंत त्यांची सनद रद्द केली.