स्थलांतरितांबद्दलची जागृकता वाढवण्याकरता एक सीरिअन निर्वासित बाहुली येत्या काळात अमेरिकेचा दौरा करणार आहे. १२ फुटांच्या या बाहुलीचं नाव अमल असून तिचं स्वरुप १० वर्षांच्या मुलीसारखं आहे. युएस कॅपिटल, बोस्टन कॉमन, जोशुआ ट्री नॅशन पार्क आणि एडमंड पेट्स ब्रिज येथे ती भेटी देणार आहे. ७ सप्टेंबरपासून हा दौरा सुरू होणार असून ५ नोव्हेंबरला युएस मेक्सिकोच्या सीमेवर हा दौरा संपेल.
या बाहुलीचे कलादिग्दर्शक निझार झुआबी म्हणाले की, “फिलाडेल्फिया, बाल्टिमोर, पिट्सबर्ग, डेट्रॉईट, शिकागो, अटलांटा, टेनेसी शहरे नॅशव्हिल आणि मेम्फिस, न्यू ऑर्लीन्स, ऑस्टिन, ह्यूस्टन, सॅन अँटोनियो आणि एल पासोची टेक्सास शहरे तसेच लॉसच्या कॅलिफोर्नियातील एंजेलिस आणि सॅन दिएगोमध्ये हे थांबे नियोजित करण्यात आले आहेत.” या ठिकाणी लिटल अमलचे प्रयोग होणार आहेत. या प्रयोगातून ती निर्वासित आणि स्थलांतरितांचे मुद्दे मांडेल.
“अमेरिकन इतिहासात असे बरेच विशिष्ट मुद्दे आहेत ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटले आणि त्यामुळेच आम्ही बोस्टनपासून याची सुरुवात करणार आहोत”, असं सहयोगी कलादिग्दर्शक एनरिको डाऊ यांग वे यांनी सांगितलं.
लिटल अमल दक्षिण आफ्रिकेच्या हँडस्प्रिंग पपेट कंपनीने तयार केली होती. या कंपनीने “वॉर हॉर्स” या हिट शोसाठी पुरस्कार विजेत्या कठपुतळ्या बनवल्या होत्या. अमलला प्रत्येक प्रयोगात चार कळसुत्रीकार (puppeteers) लागतात. तीन डोके आणि हातपाय हलवण्यासाठी. आणि एकजण तिला देत असलेल्या वस्तू उचलण्यासाठी. या अमेरिका दौऱ्यात तिच्यासोबत एकूण नऊ कळसुत्रीकार प्रवास करणार आहेत.
निर्वासित, स्थलांतरितांबद्दल अमेरिकेत बरेच मतप्रवाह तयार होत असतात. तेथील ही मते, त्यांची चर्चा ऐकण्यासाठी आम्हाला त्यांच्यात सामील व्हायचं आहे. तिथे गेल्यावर आम्हालाच भरपूर काही शिकायला मिळतं असंही झुआबी म्हणाले. लिटल अमलचा प्रत्येक प्रयोग नवा असतो. तिथे प्रत्येकवेळी नवं काहीतरी शिकायला मिळतं.
गेल्यावर्षी १७ दिवस ही लिटल अमल न्यू यॉर्कमध्ये होती. न्यू यॉर्कच्या प्रत्येक कोपऱ्यांत लिटल अमलचे प्रयोग झाले. यावेळी ब्रुकलिन सार्वजनिक ग्रंथालयातील ज्युलिअन इज अ मर्मेड आणि हार्लेमधील ड्रम सर्कल या पुस्तकाच्या अभिवाचनातही ती सामील झाली होती.