Bengaluru Woman Murder : कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेची तिच्याच पार्टनरने हत्या करून तिचा मृतदेह एका कचऱ्याच्या ट्रकमध्ये फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे बंगळुरूमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलिसांनी उलगडा केला असून पुढील तपास सुरू आहे.
नेमकी घटना काय घडली?
एका महिलेचा मृतदेह कचऱ्याच्या ट्रकमध्ये आढळून आल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरने तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून कचऱ्याच्या ट्रकमध्ये टाकला. तपासात असंही आढळून आलं की महिलेची हत्या तिच्या लिव्ह-इन पार्टनरनेच केली आहे.
रविवारी पहाटे कचऱ्याच्या ट्रकमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला. या हत्या प्रकरणात बेंगळुरू पोलिसांनी एका ३३ वर्षीय पुरूषाला अटक केली आहे. या आरोपीचं नाव शमसुद्दीन असं असून तो आसाममधील असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा आरोपी महिलेबरोबर लिव्ह-इनमध्ये राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, मृत महिलेचे नाव आशा असं असून ती दक्षिण बेंगळुरू परिसरातील रहिवासी आहे. आशा ही विधवा होती आणि गेल्या दीड वर्षांहून शमसुद्दीन बरोबर लिव्ह-इनमध्ये राहत होती. दोघेही चार महिन्यांपूर्वी एकत्र राहायला आले होते. हे दोघेही एकाच कंपनीत नोकरी करत होते आणि तेथेच त्यांची ओळख झाली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. आशा ही तिच्या पार्टनरच्या दारूच्या व्यसनाला वैतागली होती. ज्या दिवशी हत्येची घटना घडली त्या दिवशी रात्री शमसुद्दीन हा दारू पिऊन घरी परतला होता. तेव्हा त्या दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने तिचा गळा दाबून खून केला.
पोलिसांनी सांगितलं की, त्यानंतर शमसुद्दीनने तिचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि २० किमी त्याच्या दुचाकीवरून घेऊन जात एका कचऱ्याच्या वाहनात टाकला. तसेच तिच्या मृतदेहाचे हात पाय देखील बांधलेले होते, अशी माहिती देखील तपासात समोर आली आहे. दरम्यान, आरोपींची ओळख पटवण्यात रस्त्यांवरील सीसीटीव्हीची महत्वाचे ठरले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केलं असून त्याची चौकशी सुरू आहे. शमसुद्दीन हा मूळचा आसामचा रहिवासी असून त्याचं आधीच एक लग्न झालेलं आहे.