SIR Notice : सध्या देशभरात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील पात्रतेची पडताळणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेदरम्यान काही मतदारांची नावे वगळण्यात आल्याने नाराजी देखील व्यक्त केली जात आहे. एवढंच नाही तर अनेक दिग्गज नेत्यांनाही एसआयआर प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच आता दिल्लीतून देखील एक मोठी बातमी समोर आली आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, निवडणूक आयुक्त एस.एस.संधू आणि परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांना एसआयआरची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याआधी शनिवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही नोटीस बजावण्यात आली होती.

कारण काय?

मतदार यादीतील माहितीच्या विशेष सखोल पडताळणी आणि सुधारणा मोहिमेचा म्हणजे एसआयआर प्रक्रियेचा भाग म्हणून जारी करण्यात आलेल्या नोटीसच्या यादीत निवडणूक आयुक्त एस.एस.संधू, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि लालकृष्ण अडवाणी यांचाही समावेश आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

कपिल सिब्बल, मनू सिंघवी अन् मिस्री यांचाही समावेश

दरम्यान, या यादीत कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचाही समावेश आहे. या नोटीसच्या यादीनुसार, निवडणूक आयुक्त एस.एस.संधू यांना मतदार नोंदीमधील त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत आढळल्यामुळे नोटीस बजावण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

तसेच या मतदार यादी पडताळणी मोहिमेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या यादीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या पत्नी यांचीही नावे आहेत. दरम्यान, नावांमध्ये किंवा नावांच्या स्पेलिंगमध्ये विसंगती आढळणे अशा कारणांमुळे या नोटिसांच्या यादीत सत्ताधारी आणि अनेक बड्या व्यक्तींचा समावेश आहे.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता, अरविंद केजरीवाल यांनाही नोटिसा

राजधानी दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील पात्रतेची पडताळणी करण्यासाठी सुमारे ३३ लाख मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुमार सचदेवा यांच्यासारख्या प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून समोर आले.

केजरीवाल यांच्यावरील कारवाईवरून ‘आप’चा हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, त्यांचे आई-वडील आणि मुलगा यांनी मागील एसआयआर मोहिमेचा आवश्यक तपशील सादर न केल्याचे आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, या कारवाईवरून ‘आप’ने भाजपावर जोरदार निशाणा साधला. पक्षाचे राष्ट्रीय माध्यम प्रभारी अनुराग ढांडा यांनी ‘एक्स’वर टीका करताना म्हटले, “आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत की, ही पुनरिक्षण मोहीम नसून भाजपाचा डाव आहे. भाजपाच्या हातात असते तर त्यांनी केवळ पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्यापुरताच मतदानाचा अधिकार मर्यादित ठेवला असता आणि विरोधकांची मते वगळली असती. दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांची मते मतदार यादीतून गायब करण्याची ही कोणती पद्धत आहे?”