मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी अपेक्षेप्रमाणे व्याजदरात वाढ केली. रेपो दर ३५ आधार बिंदूंनी म्हणजे ०.३५ टक्क्यांनी वाढवून तो ६.२५ टक्क्यांवर नेणारी चालू वर्षांतील मे महिन्यापासून ही सलग पाचवी वाढ आहे. त्यामुळे गृह, वाहन आदी कर्ज आणखी महागणार आहे. महागाई दर निश्चित केलेल्या मर्यादेपर्यंत खाली आला नाही तर पुढेही व्याजदरवाढ केली जाईल, असे बँकेने स्पष्ट केले.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारपासून तीन दिवस चाललेल्या बैठकीअंती पतधोरण समितीने (एमपीसी) रेपो दरात वाढीचा निर्णय पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेतला. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत मेपासून आतापर्यंत एकूण २२५ आधार बिंदूंची दरवाढ केली आहे. आधी चारवेळा केलेली दरवाढ ही ‘एमपीसी’च्या सहाही सदस्यांच्या पूर्ण सहमतीने झाली होती.

china vs us
अरुणाचलबाबत अमेरिका भारताच्या बाजूने, चीनचा जळफळाट; म्हणे, “अमेरिका आमच्यात भांडणं लावतेय!”
Mukhtar Ansari Died
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, घातपाताचा संशय; उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद
US statement despite India objection that the legal process should be fair and transparent
‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य

रेपो दरातील ताज्या वाढीमुळे कर्जदारांवरील मासिक हप्तय़ांचा बोजा आणखी वाढणार आहे. विशेषत: घर, वाहन आणि शैक्षणिक कर्जाचे व्याजदर वाढणार असून, पर्यायाने सर्वसामान्यांच्या उत्पन्नातील अतिरिक्त हिस्सा त्यावर खर्च होणार आहे. एकीकडे महागाईची झळ आणखी काही काळ सोसावीच लागेल, असे संकेतही रिझव्‍‌र्ह बँकेने दिले आहेत, तर दुसरीकडे कर्जाच्या मासिक हप्तय़ात वाढीचा बोजाही सर्वसामान्यांवर येणार आहे.

महागाईबाबत चिंता कायम

चालू आर्थिक वर्षांसाठी किरकोळ चलनवाढीच्या दराचा अंदाज ६.७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. महागाईचा दर अजूनही सहनशील पातळीच्या वर कायम असून तो निश्चित पातळीपर्यंत खाली आणण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक प्रयत्नशील आहे. अर्जुनाने घेतलेल्या डोळय़ाच्या लक्ष्यवेधाप्रमाणे रिझव्‍‌र्ह बँकेचे महागाई नियंत्रणाकडे लक्ष असेल, असे दास म्हणाले. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यापासून सलग दहा महिने महागाई दर ६ टक्क्यांहून अधिक पातळीवर कायम आहे. चालू वर्षांतील चौथ्या अर्थात जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत महागाई दर ६ टक्क्यांच्या खाली येण्याची आशा मध्यवर्ती बँकेने व्यक्त केली आहे. खनिज तेलाचे दर प्रति पिंप सरासरी १०० डॉलरवर राहणे आणि समाधानकारक मोसमी पाऊस गृहीत धरून पुढील आर्थिक वर्षांतील पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत महागाईदर अनुक्रमे ५ आणि ५.४ टक्के राहील, असे सूतोवाच करण्यात आले आहे.

हप्तय़ात वाढ किती?

समजा, बँकेकडून २० वर्षांच्या कालावधीसाठी ८.५५ टक्के दराने ५० लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले असेल आणि त्यावर सध्याचा मासिक हप्ता ४३,५५० रुपयांचा असेल तर त्यात आता ०.३५ टक्क्यांची वाढ गृहित धरल्यास कर्जाचा नवा व्याजदर ८.९० टक्के होईल. म्हणजे कर्जदाराला ४४,६६५ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच मासिक हप्तय़ात १,११५ रुपयांची वाढ होईल. त्यामुळे वर्षांकाठी १३,३८० रुपयांचा खर्च वाढणार आहे.

अंदाजित विकासदरात घसरण अंधकारमय जगात भारतीय अर्थव्यवस्था एक आशेचा किरण आहे, असे नमूद करत रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा सुधारित अंदाज वर्तवला आहे. याआधी बँकेने जीडीपी वाढीचा दर ७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. जागतिक बँकेने दोन दिवसांपूर्वीच भारताचा अंदाजित जीडीपी ०.४० टक्क्यांनी वाढवून तो ६.९ टक्के राहण्याची आशा व्यक्त केली होती. विकासदराच्या अंदाजात घट केली असली तरी जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येईल, असे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.

अमेरिकेच्या ‘फेड’चा दर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे. परंतु आमची धोरणे प्रामुख्याने देशांतर्गत घटकांद्वारे निर्धारित केली जातात. आम्ही त्यासाठी ‘फेड’च्या निर्णयाकडे पाहत नसतो. अर्जुनाने घेतलेल्या डोळय़ाच्या लक्ष्यवेधाप्रमाणे आमचे महागाई नियंत्रणाकडे लक्ष असेल.

-शक्तिकांत दास, रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर