उत्तराखंडमधील भदोई जिल्ह्यातील जहांगीराबादमध्ये रविवारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथील एका महिलेने आपल्या पाच मुलांना गंगेत फेकून दिलं आहे. पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर तिने हे कृत्य केल्याचे समजते. मात्र लॉकडाउनच्या कालावधीमध्ये जेवण न मिळाल्याने तिने नैराश्येमधून हा प्रकार केल्याची अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन डायव्हर्सच्या मदतीने मुलांचा शोध सुरु केला. या प्रकरणात पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे मानसिक संतुलन ठिक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून या महिलेचे आणि तिच्या पतीचा सतत वाद होत असे. याच वादाला कंटाळून महिलेने पाच मुलांसहीत नदीत उडी मारली. मात्र नंतर ही महिला पोहून नदीकाठी येऊन बसली. मुले मात्र बुडली. “मुलांचा शोध घेण्याला आमचे प्राधान्य आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी नंतर करु,” अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार लॉकडाउनमध्ये अन्न न मिळाल्याने घडल्याची सोशल मिडियावर चर्चा असली तरी उत्तर प्रदेश पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे.

करोनामुळे देशामध्ये २४ मार्च ते १४ एप्रिल या २१ दिवसांच्या कालावधीमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या कालावधीमध्ये हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे आणि कामगारांचे खूप हाल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लॉकडाउनमुळे सर्व कारखाने आणि कामं बंद राहणार असल्याने अनेक मजूर पायी चालत आपल्या राज्यांमध्ये परत निघाल्याचे चित्र मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पहायला मिळालं. त्यानंतर स्थानिक राज्य सरकारांनी पुढाकार घेत या मजुरांच्या जेवणाची आणि राज्याची सोय केली आहे. मात्र याचा संबंध काही जणांनी या घटनेशी जोडून हा प्रकार जेवायला न मिळाल्याने घडल्याचे म्हटले होते. मात्र पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतर आता हा प्रकार वादामधून घडल्याचे उघड झालं आहे.