करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवला आहे. गेल्या काही दिवसांपासून हातावर पोट असणाऱ्या मजूर आणि कामगार वर्गाला या लॉकडाउनचा फटका बसत होता. अखेरीस केंद्र सरकारने इतर राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घरी जाण्याची परवानगी दिली. त्यांच्यासाठी रेल्वे विभागाने खास गाड्यांचीही सोय केली. परंतू काही मजुरांच्या नशिबात अजुनही पायी प्रवास करणं सुरुच आहे. तेलंगणात कामासाठी आलेल्या मजूर महिलेने छत्तीसगडला आपल्या घरी जात असताना वाटेतच मुलाला जन्म दिला आहे.

तेलंगणामधील संगरेड्डी जिल्ह्यातून या महिलेने आपल्या परिवारासह छत्तीसगडच्या दिशेने प्रवास सुरु केला. मात्र वाटेतच मंगळवारी पहाटे ४ वाजल्याच्या दरम्यान या मजूर महिलेला प्रसुतीकळा सुरु झाल्या. महिलेचा पती व परिवारातील इतर सदस्यांनी मिळून या महिलेची प्रसुती केली. शिवनूर गावाजवळ रस्त्यावरच महिलेने एका मुलाला जन्म दिला. यावेळी परिसरात बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने या महिलेला अँब्युलन्समधून जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी महिला व बाळाची योग्य तपासणी केली आहे. दोघेही सुखरुप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हैदराबादमधून पायी चालत छत्तीसगड गाठायचं ठरवल्यानंतर हा परिवार दररोज ७० किलोमिटरचा प्रवास करत होता. या महिलेला साडेतीन वर्षाचा मुलगा आहे, जो लॉकडाउन काळात आपल्या आई-बाबांसह पायी छत्तीसगडच्या दिशेने प्रवास करत होता.