Lockdown in India Hardeep Singh Puri Petrol Diesel Price Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे एकाबाजूला एलपीजी गॅसची टंचाई, पेट्रोल-डिझेलची संभाव्य महागाई होण्याची चर्चा होत असताना भारतात लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. गावात, बाजारपेठांत, शहरांमधील छोटे दुकानदार लॉकडाऊनच्या चर्चेने चिंतेत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काही शहरांमध्ये पेट्रोल पंपच्या बाहेर लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या. यावर आता केंद्र सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या अफवेवर सरकारचे उत्तर
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत याबद्दल अधिकृत भूमिका मांडली. ते म्हणाले, “भारतात लॉकडाऊन होणआर असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. भारत सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.”
हरदीप सिंग पुरी यांनी, नागरिकांना शांत आणि जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. अशा परिस्थितीत जर कुणी अफवा पसरवून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते बेजबाबदार आणि हानिकारक कृत्य आहे, असेही ते म्हणाले.
हरदीप सिंग पुरी पुढे म्हणाले, “जागतिक परिस्थिती सध्या अनिश्चित असली तरी आम्ही ऊर्जा, पुरवठा साखळी आणि महत्त्वाच्या उत्पादनांशी निगडित परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक बाबींचा योग्य पुरवठा होईल, याची काळजी घेत आहे. कोणत्याही अडथळ्यांशिवाय ऊर्जा पुरवठा सुरू आहे. कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत.”

भारताने यापूर्वीही जागतिक संकट काळात एकजुटीने उभे राहण्याची किमया करून दाखवली आहे. पुढेही अशी काही परिस्थिती उद्भवल्यास आपण त्याचा योग्यरित्या सामना करू, असेही ते म्हणाले.
इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने शुक्रवारी मोठा निर्णय घेतला. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपयांवरून ३ रुपये प्रति लिटरपर्यंत कमी केले. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांवरून आत शून्यावर आणले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असताना तेल कंपन्यांना होणारा तोटा कमी करण्यासाठी सरकारने आपल्या करातील महसूलावर पाणी सोडले आहे. तसेच भारताबाहेर निर्यात होणाऱ्या इंधनावर आता निर्यात कर लादण्यात येत आहे. ज्या रिफायनरी विदेशात इंधन निर्यात करत आहेत, त्यांना आता हा कर द्यावा लागेल, अशीही माहिती पुरी यांनी दिली.
