लोको पायलटने समोसे विकत घेण्यासाठी चक्क ट्रेन थांबवली होती. ही घटना मध्य प्रदेशातल्या इंदूर मधली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानंतर रेल्वे विभागाने सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
नेमकं व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसतं आहे?
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हे दिसतं आहे की इंदूर आणि महू या दरम्यान चालणारी ट्रेन मधे थांबली. त्यातून लोको पायलट उतरला आणि त्याने समोसे खरेदी केले. समोसे घेऊन जेव्हा लोको पायलट आला तेव्हा ट्रेन पुन्हा सुरु झाली. व्हिडीओत हे स्पष्ट दिसतं आहे की लोको पायलट समोसे घ्यायला थांबला होता. लोकांचं असं म्हणणं आहे की हे हा लोको पायलट रोज करतो ज्यामुळे ट्रेनला १० मिनिटं उशीर होतो. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं असून त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिकांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. जो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांचं म्हणणं काय?
या प्रकरणी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यांनी हे म्हटलं आहे की सदर प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली असून अधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. ट्रेन नेमकी का थांबली होती, किती वेळ थांबली होती, सिग्नल होता का? लोको पायलट खाली का उतरला होता हे सगळं तपासलं जाईल असं या निवेदनात म्हणण्यात आलं आहे. दुसरीकडे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी असंही म्हटलं आहे की लोको नंबर २७२३७ आणि २७६०० पासून सुरु असणारी ट्रेन RAU यार्ड मध्ये ट्रॅकवर चालणाऱ्या इंजिनिअरींगच्या कामसाठी सिग्नल मिळाल्याने थांबवली होती. मात्र या दरम्यान असिस्टंट लोको पायलट समोसे आणि कचोरी घ्यायला उतरला होता. ट्रेन लोको पायलटला समोसे घ्यायचे होते म्हणून थांबवलेली नव्हती. हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला आहे असंही रेल्वेने म्हटलं आहे.
