Lok Sabha 2019 : पहिल्या टप्प्यात ६९.४३ टक्के मतदान, बंगालमध्ये पडली सर्वाधिक मतं

हायटेक व्यवस्था केलेली असतानाही २४ तासांनंतरही मतदानाची संपूर्ण आकडेवारी समोर न आल्याने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी (११ एप्रिल) १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांत ९१ जागांसाठी एकूण ६९.४३ टक्के मतं पडली. राज्यांमध्ये सर्वाधिक ८३.७९ टक्के मतदान पश्चिम बंगालच्या दोन जागांवर झाले. तर सर्वाधिक कमी ५३.४७ टक्के मतदान बिहारमधील चार जागांवर झाले. तर केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये ८४.९६ टक्के मतदान झाले. या आकडेवारीत काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

हायटेक व्यवस्था केलेली असतानाही २४ तासांनंतरही मतदानाची संपूर्ण आकडेवारी समोर न आल्याने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत सर्व ९ टप्प्यांमध्ये एकूण ६६.४४ टक्के मतदान झाले होते.

पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये लक्षद्वीप आणि बंगाल पुढे आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेश (७८.१४ टक्के), अरुणाचर प्रदेश (६७.०८), आसाम (७८.२३), बिहार (५३.४७), छत्तीसगड (६५.८०), जम्मू-काश्मीर (५७.३५), महाराष्ट्र (६३.०४), मणिपूर (८२.८२), मेघालय (७१.४१), मिझोराम (६३.०२), नागालँड (८३.१२), ओडिशा (७३.७६), सिक्किम (७८.१९), तेलंगाणा (६२.६९), त्रिपुरा (८३.२६), उत्तराखंड (५९.८९), प. बंगाल (८३.७९), अंदमान-निकोबार (६४.८५) आणि लक्षद्वीप (८४.९६) मतदान झाले.

दरम्यान, आंध्र प्रदेशातील दोन मतदारसंघात एकाच वेळी मतदान पार पडले. २०० पेक्षा अधिक केंद्रांवर गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत मतदान सुरु होते. विधानसभेसाठी आंध्र प्रदेशात ७८.१४ टक्के, ओडिशात ७३.७६, सिक्कीम ७८.१९ आणि अरुणाचल प्रदेशात ६७.०८ टक्के मतं पडली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lok sabha 2019 69 43 percent voting in first phase highest vote in bengal