नवी दिल्ली : लोकसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी एकत्रितपणे केलेली घोषणाबाजी, निदर्शने, फलकबाजी यांमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व गदारोळात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेवरील उत्तराचे भाषण करता आले नाही. मोदींच्या भाषणाविनाच सभागृहाचे कामकाज संध्याकाळी पाचनंतर तात्काळ तहकूब केले गेले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील दोन दिवसांच्या (न झालेल्या!) चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लोकसभेत संध्याकाळी पाच वाजता उत्तर देतील, असे जाहीर केले गेले होते. या भाषणासाठी मोदी चारच्या सुमारास संसदेमध्ये आले होते. लोकसभेचे कामकाज पाच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर कामकाज सुरू झाले तरी मोदी सभागृहात आलेच नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे दोघेही अनुपस्थित होते. लोकसभाध्यक्ष ओम बिर्लादेखील सभागृहात आले नाहीत. आता मोदींचे भाषण लोकसभेत गुरुवारी होणार की नाही, याबाबत केंद्र सरकारच्या वतीने कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
लोकसभेतील मोदींच्या गैरहजेरीवरून काँग्रेस व इतर विरोधी सदस्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. ‘मोदी भित्रे असल्यामुळे ते सभागृहात उपस्थित राहिले नाहीत’, अशी थेट टीका काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना केली. याआधी संसदेच्या आवारात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट मोदींना आव्हान देत, ‘मला नाही वाटत की मोदी आज लोकसभेत येण्याची हिंमत करतील’, असा टोमणा मारला होता. ‘मोदी जर खरोखरच लोकसभेत आले तर मी त्यांना जनरल मनोज नरवणे यांचे पुस्तक देईन. त्यांनी ते वाचले पाहिजे म्हणजे त्यांना चीनसंदर्भातील वस्तुस्थिती कळेल’, असे राहुल गांधी म्हणाले होते.
लोकसभेत दुपारी दोनच्या सुमारास भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पं. नेहरूंवर अत्यंत अश्लाघ्य व आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे काँग्रेसचेच नव्हे तर तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी विरोधी पक्षांचे सदस्यही संतापले होते. संध्याकाळी पाच वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचे सदस्य लोकसभाध्यक्षांच्या आसनासमोर जागेत गोळा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात, जो उचित लगे वो करो, असे लिहिलेला भला मोठा फलक आणला होता. लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी हल्ला केला तेव्हा मोदींनी हे वाक्य उच्चारल्याचा कथित उल्लेख जनरल नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकात असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्याचा संदर्भ घेऊन हा मोठा फलक लोकसभेत आणला गेला होता. विरोधक आक्रमक झाले असताना सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. या गदारोळात पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी कामकाज तहकूब केले.
लोकसभेत बुधवारी दुबेंनी नेहरूंवर अय्याशी, मक्कारी, भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला होता. ‘दुबेंनी आक्षेपार्ह टिप्पणी केली त्यावर लोकसभाध्यक्षांनी काय कारवाई केली, लोकसभाध्यक्षांनी विरोधी सदस्यांना चर्चेसाठी दुपारी चार वाजता त्यांच्या दालनात बोलावले होते. आम्ही बिर्लांना विचारले की, तुमचे म्हणणे सत्ताधारी सदस्य ऐकत नाहीत. गोंधळ घातला म्हणून आमच्या खासदारांना निलंबित केले. मग तुम्ही सत्ताधारी खासदारावर काय कारवाई करणार? त्यावर त्यांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निर्णय देतो असे सांगितले होते. पण त्यांनी काही कारवाई केली नाही. आम्हाला न्याय मिळाला नाही’, असे वर्षा गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
मोदींच्या आसनाला घेराव
लोकसभेचे कामकाज सुरू असतानाच काँग्रेसच्या महिला खासदारांनी फलक घेऊन सत्ताधारी बाकांवरील मोदींच्या आसनाला घेराव घातला. विरोधी सदस्य आक्रमक झाले असताना मोदी कसे सभागृहात येणार, त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती, असे भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांना सांगितले. दुबे प्रकरणानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीबाबत वरिष्ठ केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, किरेन रिजिजू, अर्जुराम मेघवाल व इतर मंत्र्यांची बैठक झाल्याचे समजते. त्यानंतर केंद्र सरकारने रणनीती निश्चित केल्याचे कळते.
सभागृहातच दुबेंशी बाचाबाची
सत्ताधारी बाकांना घेराव घालत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, ज्योतिमणी, प्रतिभा धानोकर यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना जाब विचारण्यास सुरुवात केली. तोपर्यंत सभागृह तहकूब झाले. त्यांची दुबेंशी बाचाबाची झाली. हे पाहून भाजपच्या महिला खासदार दुबेंच्या भोवती गरडा घातला. या प्रकारामुळे सभागृहामध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. प्रसंगावधान साधून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुबेंना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले आणि भाजपच्या खासदारांना आवरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे खासदार दीपेंदर हुडा यांनी हस्तक्षेप करून काँग्रेसच्या खासदारांना शांत केले. दुबे सभागृहाच्या बाहेर येऊन लोकसभेच्या लॉबीत उभे राहिले. तिथेही काँग्रेसच्या वर्षा गायकवाड वगैरे खासदारांनी दुबेंना गाठण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दुबे निघून गेले. दुबे बुलेट ट्रेनसारखे पळून गेल्याची उपहासात्मक टीका प्रियंका गांधी-वढेरा यांनी केली.

