काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात घुसून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. “जवळपास २० ते २५ काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात प्रवेश केला आणि त्यांना शिवीगाळ केली. मीही तिथे होतो. बिर्ला यांचा स्वभाव मृदू आहे, अन्यथा त्यांनी कडक कारवाई केली असती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रियांका गांधी आणि केसी वेणुगोपाल यांच्या इतर काँग्रेस खासदार दालनात उपस्थित होते”, असे रिजिजू यांनी पत्रकारांना सांगितले.

ओम बिर्लांवर विरोधी खासदारांचे आरोप

संसदेत सरकार आणि विरोधकांमध्ये वाढत्या संघर्षादरम्यान हे नवीन आरोप करण्यात आले आहेत. मंगळवारी विरोधी पक्षांनी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदावरून काढून टाकण्याची सूचना सादर केली, त्यांच्यावर “स्पष्टपणे पक्षपाती” पद्धतीने काम करण्याचा आरोप केला आणि हा प्रश्न सुटेपर्यंत त्यांनी सभागृहाचे अध्यक्षपद सोडावे अशी मागणी केली.

काँग्रेस खासदारांनी केवळ सभापतींशी गैरवर्तन केले नाही, तर संसदीय नियमांचेही उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. मात्र, काँग्रेसने रिजिजू यांचे हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. उलट, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस खासदारांविरुद्ध खोटे दावे केल्याचा आरोप केला आहे.

“ओम बिर्लांच्या भूमिकेमुळे संसदीय संस्थांवर प्रश्नचिन्ह”

काँग्रेसने पुढे म्हटले आहे की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संसदीय संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येऊ नयेत, असे आवाहन बिर्ला यांनी केले होते. काही विरोधी खासदारांकडून पंतप्रधानांना इजा पोहोचविण्याचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे संसदेतील वातावरण आणखी तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.

खासदार ज्योतिमणी काय म्हणाल्या?

काँग्रेस खासदार ज्योतिमणी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. लोकसभेतील प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आमच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. सभापतींनी संसदेत काही अनुचित घटना घडल्याचे म्हटले होते, मात्र त्यांनी प्रसिद्ध केलेला व्हिडिओ या दाव्याला छेद देणारा आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “काँग्रेसच्या महिला खासदारांनी हातात बॅनर घेऊन ट्रेझरी बाकांजवळ जाऊन शांतपणे उभे राहत निषेध नोंदवला. विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नव्हती, त्यामुळे आम्ही पंतप्रधान आमच्या निषेधाकडे लक्ष देतील, याची वाट पाहत होतो. मात्र, भाजपच्या अनेक मुखपत्रांनी आम्ही पंतप्रधानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा खोटा दावा केला. रिजिजू यांनी प्रसिद्ध केलेला व्हिडिओ या आरोपांना खोडून काढतो.”

सभागृहाच्या शिष्टाचार आणि प्रतिष्ठेबाबत बोलताना ज्योतिमणी यांनी भाजपवरही टीका केली. त्या म्हणाल्या, “काँग्रेसने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये भाजप खासदारांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या भाषणादरम्यान कागदपत्रे फाडून फेकली होती. तरीही, डॉ. मनमोहन सिंग शांतपणे बोलत राहिले. हेच एका पंतप्रधानांचे धाडस आणि संसदीय परंपरेप्रती असलेली बांधिलकी दर्शवते.”