भक्ती बिसुरे, पुणे

राजकारण आणि समाजकारणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी महिला आणि मुलींचे प्रश्न हे नेहमीच विशेष जिव्हाळ्याचे विषय ठरले आहेत. आरोग्य सुविधा गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. कर्णबधिरांसाठी मोफत श्रवणयंत्र देण्याच्या त्यांच्या उपक्रमाची दखल ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली आहे. मतदारसंघातील शाळकरी मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी तसेच आशा सेविकांमार्फत चालणाऱ्या आरोग्यविषयक कामात खंड पडू नये यासाठी मुलींना आणि सेविकांना सायकलींसारख्या प्राथमिक सुविधा पुरवतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन त्या करतात.

संसदेतील चर्चामध्ये सर्वाधिक सहभाग घेणाऱ्या, प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. महिलांसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण, बचतगटांच्या मदतीने ग्रामीण महिलांना अर्थार्जनाचा पर्याय देणे, स्वस्त धान्य दुकानांचे परवाने देणे असे कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील मतदारांच्या सातत्याने संपर्कात राहणाऱ्या खासदार म्हणून त्या ओळखल्या जातात. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम सारख्या समाजमाध्यमांच्या प्रभावी वापरातून त्यांनी तरुण मतदारांशी संवाद कायम ठेवला आहे. राईट टू डिस्कनेक्ट विधेयक मांडून त्यांनी तरुण नोकरदारांवरील कामाच्या ताणाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघासारख्या व्यासपीठांवर त्यांनी देशाचे नेतृत्व केले आहे. ‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थांतर्फे ‘पार्लमेंटरियन अ‍ॅवॉर्ड फॉर चिल्ड्रन’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. गेल्या वेळी महादेव जानकर यांच्या विरोधात निसटता विजय मिळवल्यानंतर गेल्या पाच वर्षांमध्ये सुळे अधिक सतर्क होऊन कार्यरत राहिलेल्या पाहायला मिळाल्या.