रत्नागिरी : सर्व क्षेत्रांमधील वाढलेली महागाई आणि बेकारीमुळे सर्व सामान्यांचे जिणे मुश्किल केले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवली.

केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पाठिंब्यावर राज्यसभेत खासदार झालेल्या राणे यांनी गेल्या काही महिन्यांत प्रथमच सरकारी कारभारावर अशा प्रकारे केलेली टीका राजकीयदृष्टय़ा महत्त्वाची आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी रात्री रत्नगिरी तालुक्यातील जाकादेवी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली. या वेळी राणे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांंत सर्वत्र व्यवसाय ठप्प झाले आहेत. व्यापा-यांची पिळवणूक केली जात आहे. लोकांना छळायचे, त्यांचे शोषण करायचे हा एककलमी कार्यक्रम चालू आहे. कोणताही व्यवसाय आज सुरक्षित राहिलेला नाही.  सर्व प्रकारची महागाई आणि बेरोजगारीने सामान्य माणसाचे जिणे मुश्किल करून टाकले आहे.

शिवसेना म्हणजे आता केवळ ‘लूट सेना‘ उरली आहे, अशी टीका करत राणे म्हणाले की, सेनेच्या सध्याच्या नेतृत्वानेच मराठी माणसाला देशोधडीला लावले आहे. मुंबईतील मराठी माणसाचा टक्का ६० वरून १८ पर्यंत खाली घसरला आहे. अशा या शिवसेनेला कोकणातूनही हद्दपार केल्याशिवाय येथे चांगले दिवस येणार नाहीत.

गेल्या मंगळवारी मध्यरात्री हातखंबा येथे नीलेश राणे यांच्याविरुद्ध पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याचा थेट उल्लेख न करता, पोलिसांनी पक्षपात किंवा अन्याय करू नये. तसेच आम्हाला कायदा शिकवू नये, अशी तंबीही राणे यांनी दिली.