लोकसभा निवडणुकीच्या तारखांची झालेली घोषणा आणि विविध सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार पुन्हा येण्याचा व्यक्त केलेल्या अंदाजामुळे शेअर बाजारात उत्साह दिसून आला. सोमवारी मागील सहा महिन्यातील सर्वोच्च स्तराला स्पर्श केल्यानंतर बाजार आज (मंगळवार) पुन्हा एकदा तेजीने उघडला. दुसरीकडे रुपयाही डॉलरच्या तुलनेत ७० च्या खाली ट्रेंड करत आहे.

सेन्सेक्स १९५.५५ अंशाच्या (०.५३ टक्के) उसळीसह ३७,२४९.६५ अंशावर उघडला. तर निफ्टी ६३.३० अंशांनी मजबूत होऊन ११,२३१.३५ अंशावर सुरु झाला. निवडणूक वातावरण प्रत्यक्षात अवतरत असल्याने स्थानिक गुंतवणूकदारांबरोबर परदेशी गुंतवणूदारसंस्थाही खरेदीसाठी आक्रमक झाल्या. परिणामी प्रमुख भांडवली बाजारातील मिड, स्मॉल कॅपसारखे निर्देशांकही वाढू लागले. गेल्या काही सत्रांमध्ये ते उतरणीला होते.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची भक्कमता नव्या सप्ताहाच्या पहिल्या सत्रात नोंदली गेली. स्थानिक चलन शुक्रवारच्या तुलनेत २५ पैशांनी वाढत ६९.८९ वर स्थिरावले. येथील भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर रुपयालाही परकीय चलन विनिमय मंचावर मागणी राहिली. साप्ताहिक तुलनेत गेल्या आठवड्या स्थानिक चलन ७ पैशांनी वाढले होते.