शिवाजी खांडेकर, पिंपरी

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून पक्षाची उमेदवारी दिली. पवार यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत डॉ. कोल्हे यांनी लक्षणीय विजय संपादन केला.

शिरूर मतदार संघातून निवडून आलेले डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म नारायणगावमधील कोल्हेमळा येथे १८ ऑक्टोबर १९८० रोजी झाला. त्यांचे वडील रामसिंग पाटबंधारे खात्यामध्ये अभियंता होते, तर आई गृहिणी. डॉ. कोल्हे यांना एक मोठा भाऊ असून ते भोसरीतील एका खासगी कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करतात. नारायणगावमध्येच त्यांचे आजोळ असून त्यांच्या आजोळघरी सामाजिक कार्याचा वारसा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेक बडे नेते त्यांच्या आजोळी येऊन गेले आहेत. डॉ. कोल्हे यांना लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या व्यक्तिमत्त्वाबद्दल मोठे आकर्षण होते. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी नारायणगावमध्ये घेतले. नंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले.

दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता यादीमध्ये ते झळकले होते. बारावीनंतर त्यांनी मुंबईच्या सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी. एस.) महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी पूर्ण केली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईच्या केईएम रुग्णालयात नोकरी केली. नोकरी करून ते कोल्हापूरला मालिकांच्या चित्रीकरणासाठी जायचे. ‘राजा शिव छत्रपती’ या ऐतिहासिक मालिकेपासून ते अभिनेता म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर ते आता ‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ या मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करत आहेत. डॉ. कोल्हे यांची पत्नीही डॉक्टर आहे. त्यांना आद्या ही मुलगी आणि रुद्र हा मुलगा आहे. डॉ. कोल्हे यांनी २०१४ साली शिवजंयतीच्या मुहूर्तावर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना स्टार प्रचारक हे पदही दिले होते.