लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या काँग्रेसमध्ये सहभागी होण्यावर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनीक्षी सिन्हा हिने प्रतिक्रिया दिली आहे. वडिलांनी खूप पूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता, असे सोनाक्षीने म्हटले आहे. माझ्या वडिलांना जो सन्मान मिळायला हवा होता. तो भाजपात मिळाला नसल्याचे तिने म्हटले आहे.

काय म्हटलंय सोनाक्षीनं…

हा निर्णय त्यांच्या पंसतीचा आहे. मला वाटतं जर तुम्ही कुठं आनंदी नसाल तर तुम्हाला बदल करावा लागतो आणि त्यांनी तेच केलं आहे. मला आशा आहे की, काँग्रेसशी जोडले गेल्यानंतर ते आणखी चांगलं काम करती आणि स्वत:ला उपेक्षित समजणार नाहीत. माझे वडील पक्षाच्या सुरूवातीपासून सदस्य आहेत आणि त्यांनी मोठा सन्मान मिळवला आहे. त्यांनी जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत काम केले आहे. पण आता तो सन्मान त्यांना मिळत नाही, ज्यावर त्यांचा हक्क आहे. मला वाटतं त्यांनी हा निर्णय घेण्यास विलंब केला. हा निर्णय त्यांनी फार पूर्वीच घ्यायला हवा होता.

उल्लेखनीय म्हणजे, शत्रुघ्न सिन्हा सुमारे तीन दशके भाजपाबरोबर होते. ते अटलबिहारी सरकारमध्ये मंत्रीही होते. अडवाणी गटाचे ते नेते मानले जात होते. मोदी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज होते आणि सातत्याने ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत भाजपाच्या आघाडीच्या नेतृत्वावर टीका करत होते. ते भाजपा सोडणार अशी दीर्घ काळापासून चर्चा सुरू होती. अखेर भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना पाटणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपात असतानाही शत्रुघ्न सिन्हा हे अनेकवेळा आरजेडीच्या मंचावर दिसून आले. अनेक मुद्यांवरून त्यांनी विरोधी पक्षांना पाठिंबा दिला आहे.