नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी लोकसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरी आणि मतमोजणीच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.भाजपचे प्रमुख जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआला मोठा विजय मिळण्याचा अंदाज वर्तवणाऱ्या मतदानोत्तर चाचण्या आणि इंडिया गटाच्या बैठकींच्या मालिकेनंतरच्या प्रचलित राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीत जातीय, धार्मिक ध्रुवीकरण; तज्ज्ञांचे मत

‘‘सात टप्प्यात झालेल्या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी आणि मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली,’’ असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. या बैठकीत मतदानाच्या सर्व सात टप्प्यांदरम्यान घेण्यात आलेल्या मतदान पद्धतीवरही चर्चा झाली, असे तावडे म्हणाले. मतमोजणीसाठी देशभरात पक्षाचे उमेदवार प्रतिनिधी तैनात करण्यावरही या बैठकीत चर्चा झाली, अशी माहितीही त्यांनी दिली.

बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विरोधकांना तोंड देण्यासाठी पक्षाच्या रणनीतीवर विचारमंथन केल्याचे समजते. परंतु या संदर्भात पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. भाजपच्या एका शिष्टमंडळाने रविवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर भारताच्या निवडणूक प्रक्रियेची अखंडता खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आणि मतमोजणी दरम्यान ‘हिंसा आणि अशांतते’चे कोणतेही प्रयत्न रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला आवाहन केले.