चौथ्या टप्प्यात उद्या मतदान; शेवटच्या दिवशी रणधुमाळी

महाराष्ट्रातील मतदानाच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी धडाडणाऱ्या प्रचारतोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्या. सर्व पक्षांच्या नेत्यांनी मुंबईसह राज्यात प्रचारसभा घेऊन आणि प्रचारफेऱ्या काढून वातावरण दणाणून सोडले होते. ते शनिवारी संध्याकाळनंतर शांत झाले.

राज्यात निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सोमवारी, २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यासाठीचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपला. या टप्प्यात मुंबईतील सहा, ठाणे, पालघर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील मिळून १७ मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नाशिकमध्ये सकाळी प्रचारसभा घेतली आणि ते मुंबईत दाखल झाले. त्यांनी दुपारी पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी कुर्ला परिसरात प्रचारफेरी काढली. त्यांच्यासोबत ‘रासप’चे अध्यक्ष आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, आमदार मंगेश कुडाळकर हेही होते. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांनी आपला भाऊ चित्रपट अभिनेता संजय दत्त याच्यासह कुर्ला, वांद्रे, सहार भागांत प्रचारफेऱ्या काढल्या.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, कपिल सिब्बल शनिवारी मुंबईत होते. त्यांनी काही मुद्दय़ांवर पत्रकारांशी संवाद साधला आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मिलिंद देवरा यांनी ताडदेव, लालबाग परिसरांत प्रचारफेरी काढली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार प्रिया दत्त आणि उत्तर मुंबईतील उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारात सहभागी झाले.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी ईशान्य मुंबईतील भाजप उमेदवार मनोज कोटक यांच्यासाठी घाटकोपरमध्ये प्रचारसभा घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घाटकोपर पूर्वेला प्रचारफेरी काढली. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांनी मुलुंड ते मानखुर्ददरम्यान प्रचारफेरी काढली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते प्रचारफेरीत सहभागी झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर मतदारसंघातील राजेंद्र गावित यांच्यासाठी वसईत प्रचारसभा घेतली.

महत्त्वाचा टप्पा..

चौथ्या टप्प्यात नऊ राज्यांतील ७१ जागांसाठी मतदान होत असून, सध्या यापैकी ४५ मतदारसंघांमध्ये भाजपचे खासदार असल्याने हा टप्पा भाजपसाठी महत्त्वाचा आहे. यापैकी राजस्थान आणि महाराष्ट्रातील सर्व ३० जागा कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर असेल.

मतदार बाहेरगावी, उमेदवार चिंताग्रस्त

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह अनेकांनी आवाहन करूनही पाच दिवसांच्या सलग सुट्टीमुळे मुंबई-ठाणेकर मोठय़ा प्रमाणावर बाहेरगावी जात असल्याचे चित्र सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर होते. ते पाहून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केलेल्या उमेदवारांना चिंता वाटू लागली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला टर्मिनस इत्यादी रेल्वेस्थानकांवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांना गर्दी होती. एसटी बस, खासगी बस आणि अन्य वाहनांमधून सुटीसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.