भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे पासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांसोबतच संपूर्ण जगाचे लक्ष त्या विश्वचषक स्पर्धेकडे आहे. पण याच दरम्यान भारताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA च्या सरकारला निवडून दिले. ७ टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल २३ मे रोजी लागला. यात जवळपास तब्बल ३५० जागांच्या जवळपास भाजपने विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयनानंतर सर्व स्तरातून पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेदेखील मोदींना विशेष शुभेच्छा दिल्या.

मास्टर ब्लास्टर सचिनने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. “नरेंद्र मोदीजी, लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल तुम्हाला आणि भारतीय जनता पक्षाला मनःपूर्वक शुभेच्छा! उज्वल आणि सशक्त अशा नव्या भारताच्या बांधणीसाठी अख्खा देश तुमच्यासोबत आणि पाठीशी आहे”, असे ट्विट सचिनने केले आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला गेलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. तुमच्या नेतृत्वाखाली भारत मोठी उंची गाठेल असा विश्वास विराट कोहलीने आपल्या ट्विटर हँडलवर व्यक्त केला आहे.

तसेच, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानेही मोदींचे अभिनंदन केले आहे.वीरेंद्र सेहवाग याने ट्विट करून मोदींना त्यांच्या या ऐतिहासिक विजयासाठी शुभेच्छा दिल्या. “भारत जिंकला आहे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय जनतेने आपला निर्णय स्पष्टपणे सांगितले आहे. नरेंद्र मोदी जी यांचे या दमदार विजयासाठी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मोदी जी, तुमची दुसरी इनिंग अधिक चांगल्या कामगिरीची ठरू दे. भारत अशाच पद्धतीने प्रगती करत राहू दे. आणि नवी गिरिशिखरे पादाक्रांत करू दे. जय हिंद”, असे ट्विट सेहवागने केले आहे. तसेच त्याबरोबर त्याने #विजयीभारत हा हॅशटॅगही ट्विट केला आहे.

याशिवाय, अनेक क्रीडापटूंनी देखील मोदींचे ट्विटच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.