लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यात सात राज्यांमध्ये ६४ जागांवर उत्साहात मतदान झाले.  किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात ५४ टक्क्य़ांवर मतदान झाले.
अमेठी मतदारसंघातील मतदान केंद्रांवर एका फळ्यावर कमळाचे चित्र काढण्यात आल्याच्या प्रकाराला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी तीव्र आक्षेप घेतला. ही बाब आपण निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.
अमेठीच्या जगदीशपूर परिसरातील एका मतदान केंद्रावर प्रियंका गांधी यांच्या जनसंपर्क अधिकारी प्रीती सहाय उपस्थित राहिल्याच्या प्रकाराला भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी आक्षेप घेतल्याने बुधवारी या दोघींमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
मतदानावरून पत्नीवर गोळीबार
पाटणा-पतीच्या निर्णयाविरोधात दुसऱ्या उमेदवारास मत दिल्याने पत्नीवर गोळ्या झाडण्याची घटना बिहारमध्ये बुधवारी मतदानादरम्यान घडली. पसंतीच्या उमेदवाराला मत न दिल्याने विनोद पासवान याने पत्नीला गोळ्या घातल्या. यामध्ये पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर पासवान हा फरार झाला आहे. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्य़ातील मोहीउद्दीनगर गावात ही घटना घडली. उजरापूर मतदारसंघात हे गाव येते.

टक्का वाढलेलाच
(कंसातील टक्केवारी २००९ ची)
* उत्तर प्रदेश : १५ जागा
५५.५२ % मतदान (४३.३७ )
* बिहार: सात जागा
५८ % (४४.७)
ल्ल पश्चिम बंगाल : सहा जागा
८१.८% (७७.७२)
ल्ल सीमांध्र : लोकसभेच्या २५,
विधानसभेच्या १७५ जागा
७६.०१% (७५.८६)
* उत्तराखंड : पाच जागा
६२ % (५३.२८)
* जम्मू-काश्मीर : दोन जागा
४९.९८ % (४५.५७)
* हिमाचल प्रदेश : चार जागा
६५ % (५८.४)