नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकुराचा उल्लेख करताच सभागृहात सोमवारी रणकंदन माजले. या पुस्तकात चीनच्या घुसखोरीवरून नरवणे यांनी मोदी व राजनाथ यांच्या चारित्र्यावरच टिप्पणी केल्याचा राहुल गांधींच्या आरोपाला तत्काळ राजनाथ यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांच्या मदतीला थेट अमित शहाही मैदानात उतरले.

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनीही हस्तक्षेप केला. दुपारी दीड ते तीन असे दीड तास हा आक्षेपाचा गदारोळ सुरू होता. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. चार वाजता सभागृह सुरू झाल्यानंतर राहुल गांधींनी आपला हेका कायम ठेवल्याने लोकसभा दिवसभरासाठी तहकूब केली गेली.

राहुल गांधींनी हे पुस्तक सभागृहात सादर करावे, असे आव्हान राजनाथ सिंह यांनी दिले. राहुल गांधी प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचा संदर्भ देऊन देशाची दिशाभूल करत आहेत. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व काल्पनिक आहेत. त्यांनी सभागृहात त्याबाबत बोलू नये, असे राजनाथ म्हणाले. अमित शहा यांनीही राजनाथ यांच्या युक्तिवादात सूर मिळवला. मात्र, राहुल गांधींनी आपले म्हणणे न थांबवता मनोज नरवणेंच्या पुस्तकाचा संदर्भ देणे चालूच ठेवले. मोदी व राजनाथ दोघेही चीनच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास घाबरत आहेत. त्यांना एवढी कशाची भीती वाटते. त्यांना घाबरण्याजोगे काही नसेल तर त्यांनी नरवणेंच्या पुस्तकातील मोदी व राजनाथ यांच्याबद्दल व्यक्त केलेले मत ऐकून घ्यायला काय हरकत आहे, अशी आक्रमक भूमिका राहुल गांधींनी घेतली.

राहुल गांधींचे भाषण थांबवत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी, लोकसभेच्या प्रक्रियेचा नियम ३४९, ३५३ व ३८९ अंतर्गत पुस्तकाचा, मासिकाचा, वृत्तपत्र कात्रणाचा संदर्भ देऊन त्याचा मजूकर वाचता येणार नाही. त्यामुळे राहुल गांधींनी नरवणेंच्या पुस्तकाचा संदर्भ देऊ नये, अशी विनंती बिर्ला यांनी केली. तरीही राहुल गांधींनी बिर्लांचे म्हणणे न ऐकल्याने बिर्ला यांनी, तुम्ही सभापतींचा अवमान करत आहात. सभापतींनी एखाद्या मुद्द्यावर आदेश दिल्यावर सदस्यांनी त्याचे पालन केले पाहिजे, असे फर्मावले. तरीही राहुल गांधींनी चीन, नरवणे आणि आरोप कायम ठेवल्याने सभागृह तहकूब केले गेले.

लोकसभेचे कामकाज दुपारी चार वाजता सुरू झाले तेव्हा मोदी व अमित शहा हे दोघेही सभागृहात उपस्थित राहिले नाहीत. सभागृह सुरू होण्यापूर्वी बिर्ला यांनी किरेन रिजिजू व अन्य मंत्र्यांबरोबर चर्चा केली. राहुल गांधींनीही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसदेतील दालनात सल्लामसलत केली. सभागृहात संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी, राहुल गांधी हे देशाचे व सैनदलाचे मनोबल खच्चीकरणाचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी राष्ट्रहिताविरोधात बोलू नये. सैन्यदलावर टिका-टिप्पणी करणे योग्य नाही, असा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीवेळी काय झाले हे सैन्याला माहीत आहे. केंद्र सरकार मात्र लोकांपासून ही माहिती लपवत आहे असा आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल यांचे म्हणणे काय?

’लडाखमध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती, कैलास रिजवर त्यांच्या चार रणगाड्यांनी आगेकूच केली होती, असा संदर्भ जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकात दिला आहे, असा दावा राहुल गांधींनी केला.

’हे पुस्तक प्रकाशित झाले नसले तरी इंग्रजी मासिकांमध्ये त्याचा संक्षिप्त अंश छापण्यात आला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

’या चीनबाबत दिलेल्या संदर्भावर राजनाथ यांनी आक्षेप घेतला. हे पुस्तक प्रकाशित झालेले नसताना सभागृहात संदर्भ देणे नियमबाह्य असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

देशाच्या नेतृत्वाने निर्णय घेऊन दिशा देणे अपेक्षित असते. निर्णय घेण्यापासून पळून जाऊन लोकांच्या खांद्यावर निर्णयाचे ओझे टाकता कामा नये. (चिनी घुसखोरीनंतर) नेमके हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते