मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतसंघामधून प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पण या भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर नसून अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर आहेत. प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे भाजपाला चांगलाच दिलासा मिळाला आहे. एकाच नावाच्या दोन उमेदवारांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र, आता प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपाला पाठिंबा दिला आहे.

सहा मे रोजी पाचव्या टप्यात भोपाळमध्ये मतदान होणार आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. शनिवारी २७ एप्रिल रोजी प्रज्ञा ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

भाजपाने भोपाळ लोकसभा मतसंघामधून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. त्याच मतदारसंघातून प्रज्ञा ठाकूर यांनीही आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. एकाच नावच्या दोन उमेदवारांमुळे मतदारांमध्ये गोंधळ होण्याची भीती भाजपला होती. मात्र, आता प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपाची चिंता मिटली आहे.

मताचे विभाजन आणि मतदारांमध्ये संभ्रम होईल म्हणून भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांची भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर शनिवारी प्रज्ञा ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे मागे घेतला. यावेळी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शाल देऊन प्रज्ञा ठाकूर यांचा सन्मान केला.