अमित उजागरे/कृष्णा पांचाळ
आळंदी : निवडणुकांमध्ये जातीचे मुद्दे उपस्थित करणे हे चुकीचे असून अशा मुद्द्यांमुळे मतदानामध्ये काही फरक पडेल असं वाटतं नाही, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयीन तरुणांनी दिली आहे. या मुद्द्यांबरोबरच रोजगार आणि शिक्षण पद्धती यांवरही या मुलांनी लोकसत्ता डॉट काॅमशी बोलताना आपली मतं व्यक्त केली आहेत.

तरुण म्हणतात, उमेदवारांच्या जातीमुळे मतदानामध्ये फरक पडणार नाही!

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. आढळराव पाटील यांनी नुकतीच अमोल कोल्हे यांच्या जातीबाबत एक टिपण्णी केली होती. हाच मुद्दा घेऊन तरुणांनी आपली मतं मांडली आहे.

जातीच्या मुद्द्यावरुन आमचं मतदान बदलू शकतं अस नाही, असे मत आळंदी येथील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका तरुणीने व्यक्त केले आहे. आमच्यासाठी जो उमेदवार जास्त कार्यक्षम पद्धतीने काम करेन त्यालाच आम्ही मतदान करु, अशी स्पष्ट भुमिका या मुलीने मांडली. कुठल्या उमेदवाराने किती काम केलंय या एकमेव निकषांवर आमचं मतदान ठरलेलं असेल असेही या मुलीचं म्हणणं आहे.
सध्याचे तरुण हे जात बघून कोणाशी मैत्रीही करत नाहीत. राजकारणातील जातीपातीचा मुद्दा गौण आहे. एखाद्याला जातीच्या बाबतीत कमी लेखण्याचे प्रकार काही जुन्या लोकांकडून केले जायचे मात्र आजचा तरुण तसा नाही, असं योगिता गावडे या मुलीने लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना स्पष्ट केले.

सध्याची राजकारणाची स्थिती बघून नकोस झालं आहे, अशी प्रतिक्रिया वैभव लष्करे या विद्यार्थाने दिली आहे. विकासाकडे कोणीही बघत नाही विकासाचा मुद्दा मागे पडतोय. उमेदवारांनी दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे आता नव्याने अस्तित्वात नसलेले मुद्दे उपस्थित केले जात असल्याचं निरिक्षण त्यानं नोंदवलं आहे.

ऋषीकेश खाडे या विद्यार्थ्याने सांगितलं की, तरुणांसाठी रोजगार हा महत्वाचा मुद्दा आहे. बाहेर खूपच स्पर्धेच वातावरण आहे. शैक्षणिक पद्धतीत बदल होऊन नवी शैक्षणिक धोरण येण अपेक्षित आहे. डीजिटल इंडियाप्रमाणे सरकारने हा बदल करणे अपेक्षित असल्याचे त्याने म्हटलं आहे.