आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, गौतम गंभीरने राजकारणाच्या मैदानात धडाकेबाज प्रवेश केला आहे. दिल्ली पूर्व लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या गौतम गंभीरने आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात करुन संसदेत प्रवेश मिळवला आहे. गौतम गंभीरसमोर ‘आप’च्या आतिशी यांचं आव्हान होतं. अंदाजे साडेसहा लाखांचं मताधिक्य घेऊन गौतम गंभीरने आपला विजय सुनिश्चीत केला.

तिकीट मिळवल्यानंतर प्रचारादरम्यान गौतम गंभीर आणि आतिशी यांच्यात अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. आतिशी यांच्याकडून गौतम गंभीरवर अनेक आरोपही करण्यात आले. मात्र क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच खंबीर उभं राहत गौतम गंभीरने सामना केला. आपल्या विजयानंतरही दोन्ही उमेदवारांची फिरकी घेत गौतमने ट्विट केलं आहे.

याचवेळी गौतमने आपल्याला निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. यापुढे सर्व कामांमध्ये मला तुमची सोबत हवी आहे; तुमच्याशिवाय मी काहीच नाहीये असं म्हणत मतदारांना भावनिक साद घातली आहे. त्यामुळे आगामी ५ वर्षात खासदार म्हणून गौतम गंभीरची कामगिरी कशी राहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.