पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्धा येथे प्रचार सभा घेऊन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोदी यांच्यावर पलटवार करत म्हणाल्या की,  ‘पवार कुटुंबीयावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही’. सुप्रिया सुळे यांच्या विधानाबाबत महादेव जानकर यांना विचारले असता. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पवार कुटुंबावर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याची काही गरज नसून त्यांच्या कामातून प्रसिद्धी मिळत आहे. तर सुप्रिया सुळे या संसदेत मागील दहा वर्षापासुन प्रतिनिधित्व करीत आहे. पंतप्रधानाबाबतची टीका पाहून सुप्रिया सुळे यांचे विधान म्हणजे बालिशपणा असल्याचे दिसून येते.

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या पदयात्रेला सुरवात झाली. या पदयात्रेत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, महादेव जानकर हे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी महादेव जानकर यांच्याशी संवाद साधला असता. ते म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने मोठ्या प्रमाणावर कामे केली असल्याने महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. तसेच मागील निवडणुकीत बारामती मतदारसंघातून लोकसभा लढविली. त्या दरम्यान थोड्या मतांनी माझा पराभव झाला. मात्र यंदा कांचन कूल बारामतीमधून लढत असल्याने मागील दहा वर्षात सुप्रिया सुळे यांची मतदार संघातील काम पाहता यंदा त्यांचा पराभव निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.