Girish Kuber Explainer on War : इस्रायलने इराणविरोधात चालू केलेलं युद्ध पेटलं आहे. अमेरिकेनेही या युद्धात उडी घेऊन इराणची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, इराण अद्यापही बधले नाही. इराणकडून चोख प्रत्युत्तर दिलं जातंय. या दरम्यान, अमेरिकेतील माध्यमं मात्र या युद्धाशी संबंधित सरकारविरोधात वृत्तांत छापत असून जगभरात ट्रम्प सरकारचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे युद्धामुळे नरसंहार सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इनसायडर ट्रेडिंग केल्याचा दावा अमेरिकेतील फायनान्शिअल टाइम्सने केला आहे. यावरून लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विषय विषद केला आहे.
“युद्ध सुरू होतं तेव्हा युद्धाकडे बघणाऱ्यांमध्ये दोन विभागात विभागणी होते. युद्धात बळी पडलेल्यांकडे पाहणाऱ्यांचा एक गट आणि दुसरा याच्या पलीकडचा मोठा गट असतो, तो म्हणजे या सर्वांना खेळवणारा घटक असतो. या परिस्थितीत स्वतःसाठी आर्थिक फायदा घेणारा घटक असतो. अत्यंत ताजं प्रकरण फायनान्शिअल टाइम्सने उघडकीस आणलं आहे”, अशी माहिती गिरीश कुबेर यांनी दिली.
पीट हॅगसेथ यांच्याकडून इनसायडर ट्रेडिंगचा प्रयत्न
“अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हॅगसेथ म्हणत आहेत की हे युद्ध येशू ख्रिस्तासाठी लढत आहोत. पण या व्यवस्थेचं चांगलेपण असं की येशू ख्रिस्ताच्या इच्छेसाठी युद्ध केलं असा दावा करणाऱ्या अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्याचं म्हणणं ख्रिश्चन धर्मगुरूंनीच खोडून काढलं आहे. तर या हॅगसेथ यांनी आपल्याला युद्ध सुरू करायचं आहे याचा अंदाज आल्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण साहित्याविषयी कंपन्यांमध्ये गुंतवणुकींचा मोठा प्रयत्न केला. याला इनसायडर ट्रेडिंग म्हणतात. आपल्या पदामुळे जर एखादी माहिती मिळत असेल आणि ती माहिती बाराजात विकत असेल किंवा गुंतवणूक करत असेल तर ते गंभीर मानलं जातं”, असं गिरीश कुबेर म्हणाले.
“अमेरिकेत जी हास्यास्पद दर्जाची माणसं ज्येष्ठ पदांवर नेमली गेली आहेत. त्यातील एक अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हॅगसेथ एक आहेत. एरवी यांच्याकडे कोणीही पाहिलं नसतं. फॉक्स न्यूज वृत्तवाहिनीचे ते निवदेक होते. पुढे ते संरक्षण मंत्री म्हणून नेमले गेले. ट्रम्प यांना युद्धासाठी आग्रह धरणारे हेच. त्यांना जेव्हा कळलं की इराणवर हल्ला होणार आहे, तेव्हा त्यांनी अमेरिकेतली संरक्षण साहित्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे समभाग घेता येतील का किंवा त्या कंपन्यांच्या गुंतवण्या करणाऱ्या निधीमध्ये गुंतवणूक करता येईल का अशी चाचपणी करता येईल.”
…अन् हॅगसेथ यांचा प्रयत्न फसला
“मॉर्गन स्टॅनलेमार्फत जगातला सर्वांत मोठा फंड ब्लॅक रॉकमधील संरक्षणविषयी निधीमध्ये गुंतवणूक करता येईल का याची चाचपणी केली. कारण जस-जसं युद्ध सुरू होईल, त्यावेळी संरक्षण साहित्याची मागणी वाढणार, ते उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे समभाग वाढणार हा साधा हिशोब आहे. हा प्रयत्न त्यांनी केला. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. कारण, मॉर्गन स्टॅनलीमार्फत त्यात गुंतवणूक करण्याची सोय नाही, असं निष्पन्न झालं. त्यामुळे तो प्रयत्न हॅगसेथ यांना सोडावा लागला”, असं गिरीश कुबेरांनी स्पष्ट केलं.
“यावर पत्रकारितेच्या नियमाप्रमाणे फायनान्शिअल टाइम्सने हॅगसेथ यांच्याशी संपर्क साधला, मॉर्गन स्टॅनली यांच्याशी संपर्क साधला, ब्लॅक रॉकशी साधला. परिणामी हॅगसेथ यांनी ही बातमी त्यांनी नाकारली. ज्या पद्धतीने टाइम्सने जे तपशील दिलेत, त्यानुसार असा प्रयत्न जरुर केला हे निष्पन्न होतंय. पण अमेरिकेत होणारा हा पहिला प्रयत्न नाही, असंही त्यांनी सांगितलं.
डोनाल्ड रम्सफेड यांनीही केले होते इनसायडर ट्रेडिंग
पीट हॅगसेथ यांच्यावर भाष्य केल्यानंतर गिरीश कुबेर यांनी जॉर्ज बुश यांच्या कार्यकाळातील अशाच एका गैरव्यवहाराची माहिती दिली. ते म्हणाले, “बुश यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात हॅगसेथ यांचे पूर्वसुरी डोनाल्ड रम्सफेड यांनी केला होता. त्यांची एका कंपनीत गुंतवणूक होती. जिलाद लाइफ सायन्सेस कंपनी होती, ती एकच उत्पादन करायची. बुश यांना लक्षात आलं की जगात भली मोठी आजाराची साथ येणार आहे, या साथीत याच कंपनीच्या औषधाला मोठ्या प्रमाणावर मागणी येणार आहे. या कंपनीत बुश यांचा मंत्री डोनाल्ड रम्सफेड होते. त्या काळआत बर्ड फ्लु ही साथ आली. त्या आजारावर टॅमी फ्लू हे एकमेव औषध होतं. हे औषध जिलाद लाईफ सायन्सेस बनवलेलं. अशोक चव्हाणाचं तेव्हा महाराष्ट्रात सरकार होतं. त्यांच्यासह जगातील सर्व बलाढ्य देशांनी या गोळ्या खरेदी करून ठेवल्या, अशी माहिती गिरीश कुबेर यांनी दिली.
त्या आजाराच्या निमित्ताने जगभरात लाखोंनी कोंबड्या आणि बदके मारली गेली. या आजारामुळे फार भलं बुरं होत होतं, असं नाही. पण औषधानेही बरं होता येत होतं असंही नाही. पण वातावरण निर्मिती अशी केली गेली की टॅमी फ्लू नसेल तर तुमचं मरण अटळ आहे. पुण्यासारख्या ठिकाणी लोक टॅमी फ्लू घेण्यासाठी रांगा लागत होत्या. ज्यावेळेला या समभागांना प्रचंड मागणी आली त्यावेळी रम्सफेड महाशयांनी अब्जावधीचा नफा कमावला. त्यांचा नफा कमी झाल्यानंतर साथ मावळली. एका स्वीस कंपनीने जिलाद लाईफ सायन्सेस विकत घेतली. त्यावेळीही अमेरिकेच्या माध्यमांनी रम्सफेड यांची लबाडी उघड केली होती. माध्यमांची कर्तव्ये कशी पार पाडली जातात, हे यातून दिसतं”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
