लंडन : लंडनच्या रस्त्यांनी रविवारी इतिहास अनुभवला. केवळ मॅरेथॉनमधील विक्रमाचा नाही, तर शारीर क्षमतेला आव्हान देणार्या मानवी जिगीषेचाही. धावपटूंच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी ४२.१९५ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन शर्यत केनियाच्या सॅबेस्टियन सावेने दोन तासांच्या आत पूर्ण केली. असे करणारा तो जगातील पहिला, तर असे करणारा जगातील दुसराही याच स्पर्धेतला. सावेनंतर ११ सेकंदांनी शर्यत पूर्ण करणारा इथिओपियाचा योमिफ केजेल्चा.
सावेच्या विजयी धावेची वेळ नोंदली गेली १ तास ५९ मिनिटे ३० सेकंद. आधीच्या जागतिक विक्रमापेक्षा ६५ सेकंदांनी कमी. एकतीस वर्षीय सावे या आधी कधीच मॅरेथॉन स्पर्धेत हरलेला नाही. रविवारीही तो जिंकला, अगदी विक्रमासह. केनियाच्याच दिवंगत के्व्हिहन किप्टमने ऑक्टोबर २०२३ मध्ये शिकागो मॅरेथॉनमध्ये २ तास ३५ सेकंद अशी वेळ नोंदवून जागतिक विक्रम केला होता. सावेने तो तीन वर्षांच्या आतच मोडला. इथिओपियाचा केजेल्चा रविवारच्या शर्यतीत अगदी अखेरअखेरपर्यंत सावेच्या सावलीइतकाच त्याच्या पाठीमागे होता. शेवटची धाव घेताना जरा कमी पडला. पण, तरी मॅरेथॉन पदार्पणातच १ तास ५९ मिनिटे ४१ सेकंद वेळ नोंदवून तो दुसरा आला. म्हणजे, त्यानेही आधीची विक्रमी कामगिरी मोडलीच. एकाच शर्यतीत दोन धावपटूंनी दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा हा इतिहासातील पहिलाच प्रसंग. युगांडाच्या जेकब किप्लिम्बोने २ तास २ मिनिटे २८ सेकंद वेळ नोंदवून कांस्यपदकावर नाव कोरले. म्हणजे, त्याचीही वेळ आधीच्या विक्रमापेक्षा सात सेंकदांनी कमीच. सावेने लंडन मॅरेथॉनमधील आपले विजेतेपद कायम राखले.
ब्रिटिश राजधानीच्या रस्त्यांवर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जमा झालेल्या अफाट जनसमुदायाचे स्पर्धेनंतर त्याने आभार मानले. ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘सब-२’ असे काळ्या मार्करने लिहिलेला बूट मिरवत म्हणाला, ‘मला मस्त वाटते आहे, खूप आनंदी आहे मी. हा दिवस कायम स्मरणात राहील.’ महिलांच्या शर्यतीतही नव्या विक्रमाची नोंद झाली. इथिओपियाच्या तिग्स्त असेफा हिने शेवटच्या ५०० मीटरमध्ये वेग वाढवत २ तास १५ मिनिटे ४१ सेकंद वेळ नोंदवून आपला किताब कायम राखला. महिलांच्या मॅरेथॉनमधील ही आतापर्यंतची सर्वांत जलद वेळ. मात्र, २००३ मध्ये पॉला रॅडक्लिफने मिश्र शर्यतीत नोंदवलेल्या विक्रमापेक्षा ही वेळ १६ सेकंदांनी कमी होती.
पोषणाचे नियोजन : शर्यतीदरम्यान सावेने हायड्रोजन आधारित स्पोर्ट्स ड्रक्सिं आणि हाय कार्बोहायड्रेट जेल्सचा वापर केला. हे दोन्ही घटक धावण्याच्या दरम्यान शरीराला झटपट ग्लुकोज पुरवतात. त्यामुळे ४२ कि.मी. अंतरापर्यंत शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होत नाही.
चमत्काराचे घटित…
– सरासरी वेग : पूर्ण मॅरेथॉन विक्रमी वेळेत पार करण्यासाठी सावे याने ताशी २१.१ कि.मी. वेगाने सलग ४२.१९५ कि.मी. धाव घेतली.
– विशेष बूट : या शर्यतीसाठी सावेने ‘सुपर शूज’चा वापर केला. या बुटाचे वजन केवळ ९६ ग्रॅम असते. यात कार्बन फायबर प्लेट आणि विशेष मिडसोल फोम होते. या प्रकारचे बूट वापरल्याने धावपटूला प्रत्येक पावलाला अतिरिक्त ऊर्जा मिळते आणि पायाच्या स्नायूंचा थकवा कमी होऊन वेग टिकून राहण्यास मदत होते.
– मॅरेथॉन मार्ग : लंडन मॅरेथॉनचा मार्ग अन्य शर्यतींच्या तुलनेने समतल आहे. त्यामुळे उंच मार्गावर धावताना लागणारी अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागत नाही.
– पेसमेकर्सच्या मदतीने हवेचा रोध कमी करण्यात आल्याने सावेला आपला वेग स्थिर ठेवणे शक्य झाले.
– प्रशिक्षणातील बदल : सावेने या शर्यतीसाठी केनियाच्या उंचीवरील प्रदेशात सातत्याने सराव केला. उंचावर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि शरीरातील लाल रक्तपेशींमध्ये वाढ होते. त्याचा फायदा प्रत्यक्ष शर्यतीत दमछाक न होता वेगाने धाव घेण्यासाठी होतो.
