London Protest Narendra Modi Support: ब्रिटनची राजधानी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर एकाच वेळी दोन परस्परविरोधी आंदोलने पाहायला मिळाली. ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया – यूके’ या संघटनेच्या वतीने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी तिथे निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भारतीय समुदायातील काही सदस्यांनी त्याच ठिकाणी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या समर्थनार्थ जोरदार प्रतिआंदोलन केले. याबद्दल सविस्तर वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.

मोदी समर्थकांनी केंद्र सरकारला जनतेचा लोकशाही मार्गाने मिळालेला कौल असल्याचे सांगितले. तसेच परदेशात आंदोलन करताना भारताची प्रतिमा मलिन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. भारतातील निवडणूक सुधारणांवरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर लंडनमध्ये ही निदर्शने झाली.

‘मोदी सरकारला सत्तेत राहण्याचा लोकशाही अधिकार’

आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय समुदायातील एका सदस्याने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. भारतातील जनतेने लोकशाही मार्गाने हे सरकार निवडले असून, त्याला पूर्णवेळ सत्तेत राहण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आपल्या हक्कांसाठी परदेशात आवाज उठवताना भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे आवाहनही मोदी समर्थकांनी केले. भारतातील निवडणूक सुधारणांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लंडनमध्ये हा वाद पाहायला मिळाला.

SFI-UK ची आक्रमक भूमिका आणि आरोप

दुसरीकडे, ‘एसएफआय-यूके’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केल्याची पुष्टी केली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित व्हावे, तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, उजव्या विचारसरणीच्या आंदोलकांनी आपल्या निदर्शनांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ‘एसएफआय-यूके’ने केला, तरीही आपण दबावाला न जुमानता आंदोलन सुरू ठेवल्याचे त्यांनी म्हटले.

दिल्लीत ‘सीजेपी’च्या तिरंगा मोर्चासाठी पोलिसांचा नकार

लंडनमधील या घडामोडींबरोबरच भारतातही विविध शहरांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलने तापली आहेत. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’ आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या समर्थकांनी निदर्शने केली. दिल्लीत कनॉट प्लेस आणि मंडी हाऊस परिसरात शेकडो आंदोलक जमले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा, मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीची प्रक्रिया रद्द करणे आणि २०२३ चा मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायदा मागे घेणे, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या.

‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नियोजित ‘लेहराओ तिरंगा’ मोर्चाला दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे कारण देत परवानगी नाकारली होती. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व पार्श्वभूमीवर नवी दिल्लीसह मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्येही कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

ध्रुव राठी यांचे लंडनमध्ये आंदोलनाचे आवाहन

दरम्यान, यूट्यूबर ध्रुव राठी यांनीही निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर लंडनमध्ये आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता लंडनमधील पार्लमेंट स्क्वेअर येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमधून केले. निवडणुकांमधील कथित मतचोरीचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले. ‘सीजेपी’च्या आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी ध्रुव राठी यांना गुरुग्राममधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला होता.