लंडनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नीलांजन हजारिका वर्मा यांनी लंडनमधील थेम्स नदीत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याच्या प्रथेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला त्यांनी भारतीय असल्याचा अभिमान व्यक्त केला आणि जगाच्या कोणत्याही भागात गेल्यानंतर आपली संस्कृती जपता आली पाहिजे, असं म्हटलं. मात्र त्यानंतर त्यांनी थेम्स नदी आणि परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष वेधलं.

‘इथे पाण्यात एकही कचरा दिसणार नाही’

नीलांजन यांनी लंडनमधील थेम्स नदीचा परिसर दाखवत म्हटलं, “हा लंडनमधील सर्वात सुंदर आणि स्वच्छ परिसरांपैकी एक आहे. इथल्या पाण्यात तुम्हाला घाण दिसणार नाही वा एक पानसुद्धा सापडणार नाही.”

नदी परिसरात पोहणे किंवा पक्ष्यांना खाद्य देणे यांसारख्या काही कृतींवर कडक निर्बंध असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यात गणेश विसर्जनाचा मुद्दा उपस्थित केला. गणेश चतुर्थीच्या उत्सवानंतर गणेशमूर्ती जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्याच्या आपल्या परंपरेचा संदर्भ देत, त्यांनी याच मुद्यावर उपरोधिक सुरात एक सवाल केला.

“आपल्याला विसर्जन तर करायचंच आहे. कारण आपल्याला संस्कृतीचा प्रसार करायचा आहे. बरोबर? मग आपण काय करणार? गणेशजींची मूर्ती घेणार आणि थेम्समध्ये टाकून देणार. कारण थेम्सचंही शुद्धीकरण व्हायला हवं आणि आपली जबाबदारी संपली, बरोबर?” यानंतर त्यांनी उपहासाने, “व्वा! मला खूप खूप अभिमान वाटतोय.” असं म्हटलं.

‘आपल्या परंपरा सुंदर आहेत, पण…’

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नीलांजन यांनी आपल्या वक्तव्याचा उद्देश स्पष्ट केला. संस्कृती जपणं महत्वाचं असलं तरी पर्यावरणाचा आणि आपण ज्या ठिकाणी राहतो त्या परिसराचा आदर करणंही तितकंच गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं.

“तुम्हाला तुमच्या संस्कृतीचा अशा प्रकारे प्रचार करण्याची गरज नाही. आपल्या परंपरा सुंदर आहेत, पण आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचा आदर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण जिथे जाऊ तिथे आपली संस्कृती जबाबदारीने साजरी करूया,” असं त्यांनी लिहिलं.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

व्हिडीओनंतर सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाली. काही यूजर्सनी धार्मिक उत्सव साजरे करताना स्थानिक पर्यावरणीय नियम आणि परिसराची स्वच्छता यांचा विचार करण्याचं समर्थन केलं.

एका यूजरने लिहिलं की, निसर्गाप्रती जबाबदारी नसेल तर भक्तीचा उद्देशच कमकुवत होतो. काहींनी परदेशात भारतीय धार्मिक परंपरा साजऱ्या करताना स्थानिक नियमांचं पालन करण्याची गरज असल्याचं म्हटलं. तर काही यूजर्सनी गणेश विसर्जन योग्य पद्धतीनेच केलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

या व्हिडीओमुळे परदेशात भारतीय परंपरा साजऱ्या करताना स्थानिक कायदे, पर्यावरण आणि सार्वजनिक ठिकाणांच्या नियमांचा आदर कसा राखायचा, यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.