Ganga Aarti Thames River London : लंडनमध्ये रविवारी एक आगळं-वेगळं दृष्य पाहायला मिळालं आहे. लंडनमधील थेम्स नदीवर पहिल्यांदाच गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे भारतातील वाराणसीच्या घाटांसारखं दृश्य पहिल्यांदाच लंडनमधील थेम्स नदीवर पाहायला मिळालं आहे. या कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.
‘चिन्मय मिशन यूके आणि टोटली थेम्स फेस्टिव्हल’ यांच्या संयुक्त विद्यमाने थेम्स नदीच्या काठावर पहिल्यांदाच ‘गंगा आरती’चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. ‘चिन्मय मिशन यूके’ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
थेम्स नदीच्या काठावर झालेल्या गंगा आरतीच्या कार्यक्रमाला ‘गंगा आरती ऑन द थेम्स : अ सेलिब्रेशन ऑफ लाईट’ असं नाव देण्यात आलं होतं. या संस्थेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत, त्यानिमित्ताने जगभरात सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांचाच एक भाग म्हणून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
“पिढ्यानपिढ्या लोक गंगा नदीच्या काठावर एकत्र येऊन नदी, निसर्ग आणि आपलं जीवन टिकवून ठेवणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्योत अर्पण करतात. थेम्स नदीवरील गंगा आरतीमध्येही तीच भावना आहे. हा कार्यक्रम लोकांना कृतज्ञता, आशा आणि एकतेच्या एका सामायिक क्षणासाठी एकत्र आणतो. चिन्मय मिशनसाठी गंगा नदी ही ज्ञानाच्या प्रवाहाचेही प्रतीक आहे”, असं ‘चिन्मय मिशन यूके’च्या निवासी शिक्षिका श्रीप्रिया चैतन्य यांनी सांगितलं.
आरती हा कृतज्ञता व्यक्त करणारा एक पारंपरिक हिंदू विधी आहे. ज्यामध्ये मोठे दिवे, प्रार्थना, संगीत आणि मंत्रोच्चार यांचा समावेश असतो. हा विधी नदीबद्दलची आदरभावना आणि निसर्गमातेबद्दलची व्यापक कृतज्ञता व्यक्त करतो. हिंदू परंपरेत गंगेला पवित्र, जीवनदायिनी आणि जीवनाचे पोषण करणारी मानून तिचा सन्मान केला जातो”, असंही चिन्मय मिशन यूकेच्या प्रवक्त्याने सांगितलं.
दरम्यान, थेम्स नदीच्या काठावर झालेला हा कार्यक्रम पूर्णपणे जमिनीवर पार पडला. या कार्यक्रमातील कोणतीही गोष्ट नदीत टाकली नाही किंवा सोडली गेली नाही. “विधीसाठी वापरले जाणारे दिवे पाण्यात सोडण्याऐवजी नदीकाठावरच ठेवले जातील, त्यामुळे परंपरेचा सन्मान राखला जाईल आणि थेम्स नदीच्या नैसर्गिक स्थितीत कोणताही व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे”, असं चिन्मय मिशन यूकेच्या प्रवक्त्याने सांगितलं.
