Who is Vishwas Kumar Ramesh: अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामधून भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विश्वासकुमार रमेश हे सुखरुप बचावले. अपघातानंतर एका बाजूला आगीचे लोळ दिसत असताना दुसऱ्या बाजूला विश्वासकुमार विमानाच्या ढिगाऱ्यातून चालत बाहेर आले आणि स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेत बसले. जखमी अवस्थेत चालत जात असलेला त्यांचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. विमानातील २४२ लोकांपैकी ते एकमात्र वाचू शकले. पण हा चमत्कार कसा घडला? विश्वासकुमार विमानाच्या बाहेर कसे पडले? याबाबत त्यांनीच माहिती दिली आहे. डीडी न्यूजशी बोलताना आणि अपघातानंतर डॉक्टारांना दिलेल्या माहितीवरून काही बाबी समोर आल्या आहेत.

खुर्चीसकट बाहेर फेकले गेले

रुग्णालयात पोहोचल्यानंतर विश्वासकुमार रमेश यांनी डॉक्टरांना सांगितले की, विमानाच्या उड्डाणानंतर काही सेकंदातच अपघात घडला. विमान जिथून तुटले, तिथेच ११ए या सीटवर ते बसले होते. विमाना तुटल्यानंतर त्यांच्या सीटजवळच एक्झिट डोअर होते. त्यातून वेळीच बाहेर पडल्यामुळे विमानाला झालेल्या स्फोटातून ते वाचू शकले.

विश्वासकुमार यांनी डॉक्टरांना सांगितले की, मी विमानातून उडी मारली नव्हती. तर माझ्या सीटसह मी फेकला गेलो. “मी जिथे पडलो, ती जागा सपाट होती. मी सीट बेल्ट काढला आणि आजूबाजूला नजर टाकली. जमिनीवरच असल्यामुळे मी एक्झिट डोअरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला”, अशी माहिती विश्वासकुमार यांनी डीडी न्यूजशी बोलताना दिली.

“या विमान अपघातामधून मी जिवंत कसा वाचलो, यावर माझाही विश्वास बसत नाही. काही क्षणासाठी मला वाटले होते की, मीही मरणार. पण अपघातानंतर जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी जिवंत होतो. मग मी सीटबेल्ट काढून तिथून दूर गेलो”, असेही विश्वासकुमार म्हणाले.

“विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच अपघात घडला. विमान वसतिगृहाच्या इमारतीला जाऊन आदळले होते. मी जिथे बसलो होतो, तो भाग आधीच जमिनीवर पडला. माझ्या बाजूला एक्झिट डोअर होता, त्यामुळे मी तिथून बाहेर पडलो. पण माझ्या विरुद्ध बाजूला एक भिंत असल्यामुळे तिथल्या लोकांना विमानातून बाहेर पडणे शक्य झाले नसावे. मी बाहेर पडल्यानंतर विमानाचा स्फोट झाला. माझ्या नजरेसमोरच दोन एअर होस्टेस आणि एक वृद्ध जोडप्याचा मृत्यू झाला होता”, अशी माहिती विश्वासकुमार रमेश यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत विश्वासकुमार रमेश?

३९ वर्षीय विश्वास रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. ते आपल्या भावासह दीव येथे आले होते. अहमदाबादहून ते आपल्या भावासोबत परत निघाले होते. एअर इंडियाच्या AI 171 या विमानात 11A या सीटवर ते बसले होते. त्यांचा भाऊ मात्र अपघातात वाचू शकला नाही. गेल्या २० वर्षांपासून रमेश हे लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबासमवेत राहत आहेत.