लंडन : करोनाची दीर्घकालीन लक्षणे मुलांमध्ये दुर्मीळ असतात. वाढते वय हा यात धोकादायक घटक असतो, कोविडसह इतर अनेक रोग असे आहेत, ज्यात वाढत्या वयाने जोखीम वाढत असते, असे एका संशोधनात म्हटले आहे.

ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने हे संशोधन केले असून ब्रिटनमध्ये १ लाख ३१ हजार बळ करोनामुळे गेले असून त्यात केवळ तीस मुलांचा समावेश आहे. त्यामुळे करोनाचा धोका मुलांना कमी असतो.  अनेक श्रीमंत देशात मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाले असून विषाणूचा प्रसार आता उतरणीला लागला आहे व तो संपेल. करोनाच्या साथीत मुलांचा विचार केला असता त्यांच्यापैकी अनेकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही हे विशेष आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, जरी काही मुलांना करोना झाला तरी ते त्यातून लवकर बरे झाले आहेत. कोविड  लक्षणांचा अभ्यास सिटीझन सायन्स प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आला असून त्यात असे दिसून आले, की मुलांमध्ये कोविडची लक्षणेही कमी दिसली.

ज्या मुलांच्या चाचण्या सकारात्मक आल्या होत्या त्यांच्यात किमान २८ दिवस लक्षणे दिसून आली. या मुलांमध्ये डोकेदुखी, थकवा,ताप, घसा खवखवणे यासारखी लक्षणे दिसून आली. त्यांच्यात लक्षणे काही काळ दिसत असली तरी हा आजार सरासरी विचार करता सहा किंवा पाचच दिवस दिसत होता. काही किशोरवयीन मुलांमध्ये तो सात दिवस दिसत होता. ४.४ टक्के  मुलांमध्ये २८ दिवस किंवा त्यानंतर लक्षणे दिसत राहिली. प्रौढांमध्ये ही लक्षणे १३.३ टक्के लोकांमध्ये २८ दिवसाहून अधिक काळ दिसली. सुमारे ९८.४ टक्के  मुले आठ आठवडय़ात बरी झाली, त्यामुळे त्यांच्यात दीर्घ काळ हा आजार दिसला नाही.