मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलनांवर आंदोलनं सुरू आहेत. काँग्रेससह सीजेपीच्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील काही विद्यार्थ्यांना आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांसमोर आणलं. यावेळी या मुलांनी आपबित्ती सांगितली. त्यात तीन मुलींनी आणि तीन मुलांनी त्यांना कसा त्रास दिला, कसा छळ केला हे सांगितलं. पोलिसांनी अत्यंत अश्लाघ्य शिवीगाळ केली. पोलिसांनी आपल्याला गुप्तांगावर मारल्याचंही यावेळी या आंदोलकांनी सांगितलं. ज्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांना मोठा इशारा दिला.
राहुल गांधी काय म्हणाले?
“अमित शाहजी, नरेंद्र मोदीजी मी आधीही बोललो तसंच आजही तेच सांगतो आहे, हा हिंदुस्थान आहे. या सगळ्यांना नीट बघून घ्या. हा हिंदुस्थानचा आवाज आहे. तुम्ही या आवाजासमोर उभे आहात अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही या आवाजासमोर उभे आहात. मी तुम्हाला एक सल्ला देतो आहे, तुम्ही या आवाजासमोर उभे राहू नका. या आवाजाच्या समोर कुणीही उभं राहू शकत नाही. जे दिल्ली पोलीस आहेत त्यांना प्रेमाने सांगतो आहे की मी सगळ्या मुलांना सांगितलंय की व्हिडीओसह तुमच्याकडे रेकॉर्ड ठेवा. आमच्याकडे ते पुरावे ठेवा. जेव्हा हे प्रकरण संपेल, तेव्हा आम्ही प्रत्येकाला शिक्षा देऊ. ज्ञानेश कुमार असोत किंवा नरेंद्र मोदी प्रत्येकाला शिक्षा मिळणारच हे कुणीही विसरू नका असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
तरुणांचा आवाज हा देशाचा आवाज आहे-राहुल गांधी
तरूणांचा आवाज हा देशाचा आवाज आहे, या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. मी ते होऊ देणार नाही. मी परवा पत्रकारांनाही विचारलं होतं की तुम्हाला वाटतं का की नरेंद्र मोदी योग्य पद्धतीने काम करत आहेत? तुम्हीही वास्तव जगाला सांगितलंत, तुमचेही मी आभार मानतो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी एनएसयूआयशी जोडल्या गेलेल्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मोदी आणि अमित शाह हे या तरूणांच्या विरोधात उभे आहेत, पण हे तरूण म्हणजे हिंदुस्थान आहे हा तुम्हाला घाबरणारा हिंदुस्थान नाही असं राहुल गांधींनी ठणकावून सांगितलं आहे.
राहुल गांधी यांनी केरळमध्ये राहणाऱ्या आणि दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या आथिरा या विद्यार्थिनीचा विषेष उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले या मुलीला पोलिसांनी जी मारहाण केली त्यात तिचा एक कान कायमचा बधीर झाला आहे. तिच्या कानाला जखम झाली होती. आता एका कानाने तिला ऐकू येत नाही. असं म्हणत राहुल गांधींनी सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगायला सांगितले, जे सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
