Rahul Gandhi Loksabha Speech Targets PM Narendra Modi: संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच गोंधळ आणि खडाजंगीने गाजत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतावरील टॅरिफबाबत अमेरिकेची भूमिका आक्रमक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होत असल्याचं दिसत आहे. त्यातच, विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभेत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यामुळे त्यावरूनही लोकसभेत मोठा गदारोळ झाला. या पार्श्वभूमीवर आज लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी आपल्या भाषणात भारत-अमेरिका कराराचा मुद्दा उपस्थित करताच लोकसभेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
राहुल गांधींनी आपल्या भाषणात वारंवार अदाणी, अंबानी व अमेरिकेतील एपस्टाईन फाईल्सच्या खटल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी बाकांवरून संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, प्रल्हाद जोशी यांनी तीव्र आक्षेप घेतला. यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले तालिका अध्यक्ष जगदंबिका पाल यांनीदेखील राहुल गांधींना वारंवार थांबवत याबाबत समज दिली. यानंतर राहुल गांधींनी आपल्या भाषणात भारत व अमेरिका यांच्यादरम्यान झालेल्या करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
लोकसभेत काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधींनी आपल्या भाषणात अर्थसंकल्पाबाबत तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त करतानाच व्यावसायिक गौतम अदाणींचा उल्लेख केला. “आपल्या अर्थसंकल्पाच्या मूळ गाभ्यात मार्शल आर्ट्समधील डावपेचासारखा चोक (घट्ट पकड) आहे. हा चोक अदाणींनी लावलाय. अदाणी हे काही साधेसुधे व्यावसायिक नाहीत. त्यांची कंपनी काही साधी कंपनी नाही. अमेरिकेतल्या खटल्यात मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे. अदाणींना नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.
भारत-अमेरिका करारावर राहुल गांधींचं टीकास्र
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच भारत व अमेरिका यांच्यात व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यात आलं. यानुसार अमेरिकेनं भारतावर लादलेलं टॅरिफ ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत आणलं. मात्र, त्याचवेळी भारताकडून अमेरिकेवर लागू करण्यात येणारं टॅरिफ मात्र शून्यापर्यंत आणण्याचं कलम भारताकडून मंजूर करून घेतलं. याशिवाय, रशियाकडून भारतानं तेल खरेदी थांबवण्यास होकार दिल्याचंदेखील खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर हा करार भारतासाठी नामुष्कीजनक झाल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. हा मुद्दा राहुल गांधींनी आपल्या भाषणादरम्यान लोकसभेत उपस्थित केला.
“आता अमेरिका ठरवणार की भारत कुणाकडून तेल खरेदी करणार. आपले पंतप्रधान हे ठरवणार नाहीत. अमेरिका आपल्यावर कामय लक्ष ठेवणार. जर भारतानं अमेरिकेची इच्छा नसलेल्या कुठल्या देशाकडून तेल खरेदी केलं, तर ते भारताला शिक्षा करतील. आपलं टॅरिफ पुन्हा ५० टक्क्यांपर्यंत वाढवतील. कोणत्याही पंतप्रधानानं याआधी हे केलेलं नाही आणि तुमच्यानंतर कोणतेही पंतप्रधान हे करणार नाहीत”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
“देशाला विकताना तुम्हाला लाज वाटली नाही का?”
“तुम्ही सारंकाही आलबेल असल्याचं कसं सांगू शकता? तुम्हाला अशी विधानं करताना लाज वाटत नाही का? भारताला विकताना तुम्हाला लाज वाटली नाही का? पण रंजक गोष्ट ही आहे की पंतप्रधान भारताला सामान्य स्थितीत विकणार नाहीत. त्यांनी भारताला विकलं कारण अमेरिकेनं त्यांच्या गळ्याशी चोक लावला आहे. जेव्हा मार्शल आर्ट्समध्ये एक स्पर्धक दुसऱ्या स्पर्धकाला चोक करतो, तेव्हा समोरच्या स्पर्धकाच्या डोळ्यात भीती दिसते. पंतप्रधानांच्या डोळ्यांत भीती दिसतेय. ते नजरेला नजर भिडवू शकत नाहीत”, अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.
“मला असं वाटत नाही की मोदींसह कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने अशा करारावर सही केली नसती जर त्यांच्यावर कुणाची पकड नसती. टॅरिफच्या बाबतीत आपण पडती भूमिका घेतली. आपल्या माहितीचा मोठा साठा आपण अमेरिकेसाठी खुला केला. २० वर्षांचा टॅक्स हॉलिडे अमेरिकेला दिला. आपल्या शेतकऱ्यांना अमेरिकेतील बलाढ्य यंत्राधारित शेतीच्या भरवश्यावर सोडून देण्यात आलं. आपले कापड उद्योग संपुष्टात येतील. बांगलादेश आपल्यावर मात करेल. आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. आपल्याला ज्यांच्याकडून तेल खरेदी करायचं आहे, त्यांच्याकडून खरेदी करता येणार नाही. मला वाटत नाही की कोणताही पंतप्रधान असं काही करेल. ही संपूर्ण शरणागती आहे”, अशी टीका राहुल गांधींनी यावेळी पंतप्रधानांवर केली.
“हे दुर्दैव आहे. कारण ही फक्त पंतप्रधानांची शरणागती नाही. त्यांनी भारतातल्या १५० कोटी लोकांचं भविष्य पणाला लावलं आहे”, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

