Hanuman Statue Guyana : गयानातील स्पार्टा शहरातील एस्सेक्विबो किनाऱ्यावरील ‘सीता राम राधा श्याम मंदिरा’त भगवान श्री हनुमानाच्या १६ फूट उंची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. गयानातील भारतीय दूतावासाने याबाबत म्हटलं आहे की “ही मूर्ती विश्वास, मैत्री व दृढ संकल्पाचं प्रतीक आहे”. दूतावासाने सांगितलं की ही भगवान श्री हनुमानाची मूर्ती सुखलाल कुटुंबाने भारतातून आयात केली असून त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी शुक्रवारपासून (१६ मे) तीन दिवसीय यज्ञ सुरू केला होता. त्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. येथील हिंदू समुदायातील शेकडो लोक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. तसेच सीता राम राधा श्याम मंदिरात भजन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

भारतीय दूतावासाने काय म्हटलंय?

गयानातील भारतीय दूतावासाने एक्सवर एक पोस्ट करून भगवान श्री हनुमानाच्या मूर्तीचे फोटो शेअर केले आहेत. दूतावासाने म्हटलं आहे की “स्पार्टामधील सीता राम राधा श्याम मंदिरात भगवान हनुमानाची १६ फूट उंच मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. भगवान बजरंगबली भारत आणि गयानामधील लोकांचे घनिष्ठ संबंध अधिक दृढ करण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश देतील. ते आपल्या सर्वांचं कल्याण करतील”.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानातील अनिवासी भारतीयांच्या प्रभावावर प्रकाश टाकला होता. ते म्हणाले होते की “गयानात एक मिनी इंडिया आहे. तिथेही भारतीय वंशाचे लोक राजकारण, व्यापार, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर आहेत”. मोदी यांनी ‘मन की बात’च्या ११६ व्या एपिसोडमध्ये हे वक्तव्य केलं होतं. मोदी यांनी त्यावेळी गयानाच्या त्यांच्या अधिकृत दौऱ्यानंतर ही टिप्पणी केली होती.