S Jaishankar On Lord Krishna and Hanuman: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच पुण्यातील सिम्बायसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) च्या २२ व्या दीक्षांत समारंभाला भेट दिली. यावेळी त्यांनी परराष्ट्र धोरणाच्या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन ते राबवत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी त्यांच्या भूमिकेबाबत बोलत असताना भगवान कृष्ण आणि हनुमानाचा दाखला दिला. ज्याप्रकारे हनुमान प्रभू रामाची सेवा करत होते. त्याप्रमाणे मी काम करत असल्याचे ते म्हणाले.

पुण्यातील कार्यक्रमात त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, एक एस. जयशंकर पुरेसा आहे का? यावर एस. जयशंकर म्हणाले की, तुम्ही खरेतर प्रश्न दुरूस्त करायला हवा. तुम्ही मला विचारायला हवे की, एकच मोदी आहे. कारण भगवान हनुमान ज्याप्रकारे प्रभू रामाची सेवा करत होते. त्याप्रमाणे देशाची व्याख्या नेत्यांद्वारे होत असते. आज तेच (पंतप्रधान मोदी) देशाची दृष्टी, आत्मविश्वास आणि नेतृत्व आहेत.

तसेच पुण्यातील पुस्तक महोत्सवालाही एस. जयशंकर यांनी भेट दिली. येथेही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “परराष्ट्र धोरणाचा आपण विचार करतो तेव्हा त्यात सुस्पष्टता असावी लागते. तुम्हाला काही पर्याय निवडावे लागतात. माझ्यामते, तुमच्याकडे निश्चित योजना असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या फायद्याचे सर्व सकारात्मक मुद्दे एकत्र करून त्यांना योग्यरित्या हाताळावे लागते.”

भगवान कृष्ण आणि हनुमान त्यांच्या काळातील मुत्सद्दी

मुत्सद्देगिरीचे उदाहरण देत असताना एस. जयशंकर यांनी रामायण आणि महाभारताचा उल्लेख केला. ते म्हणाले, मला कुणीतरी विचारले की, तुमच्या दृष्टीने सर्वात चांगले मुत्सद्दी कोण? तर माझ्या डोक्यात सर्वात आधी भगवान कृष्ण आणि हनुमान यांचे नाव येते. महाभारतात तुम्हाला सत्तेचा संघर्ष दिसतो. कुटुंबात विभाजन होऊन लढाई होते. रामायणातही तुम्हाला युद्ध, रणनीती या गोष्टी दिसून येतात.

“भगवान कृष्ण महाभारतात मुत्सद्देगिरी दाखवतात, तर रामायणात तीच भूमिका हनुमान यांची दिसते. हनुमान यांना लंकेत माहिती घेण्यासाठी पाठवलेले असते. ते लंकेत जाऊन माहिती गोळा करतात. सीता मातेची भेट घेऊन त्यांना दिलासा देतात. तसेच रावणाची शक्ती किती, हेही तपासतात. तसेच त्यांनी बिभीषणाला हेरले. हा चुकीच्या कंपनीत आहे. त्याला आपल्या बाजूला करता येईल, असा कयास लावला”, अशा प्रकारे त्यांनी पुराणातील मुत्सद्देगिरीचे विश्लेषण केले.

एस. जयशंकर पुढे म्हणतात, “सर्व माहिती गोळा केल्यानंतर हनुमान लंकेला शेपटीने आग लावतात. त्यांनी रावणाला मानसशास्त्रीयदृष्ट्या धक्का दिला. म्हणजे बघा, त्यांना प्रभू रामाने एक काम दिले होते. त्याबदल्यात त्यांनी दहा कामे केली. चांगला मुत्सद्दी असाच तर असतो.”