भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याविरोधात आंध्र प्रदेशातील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होणार आहे. हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा धोनीविरुद्ध आरोप आहे. त्या प्रकरणात आंध्र प्रदेशातील अनंतपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.
एप्रिल २०१३ मध्ये एका मासिकाच्या मुखपृष्ठावर धोनीचे छायाचित्र छापण्यात आले होते. या छायाचित्रामध्ये धोनीला विष्णूच्या अवतारात दाखविण्यात आले होते. त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने दाखविण्यात आली होती. त्याच्या एका हातात बूटही दाखविण्यात आले होते. यावरून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून धोनी आणि संबंधित कंपनीविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेचे नेते श्याम सुंदर यांनी गेल्यावर्षी या प्रकरणी याचिका दाखल केली. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान विष्णूला अशा पद्धतीने दाखवणे अवमानकारक असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.