मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले असून देशभरात आंदोलनाचा सूर तीव्र झाला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील (SIR) त्रुटी आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, या मोर्चानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर ‘परकीय मदती’ने सत्तेत असल्याचा थेट आरोप केल्याने भाजपा आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष कमालीचा ताणला गेला आहे. राहुल गांधींच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपाने त्यांच्यावर बोचरी टीका करत त्यांना ‘लूज कॉन आर्टिस्ट’ (Lousy Con Artist) असे संबोधले आहे.
राहुल गांधींचा मोदींवर गंभीर आरोप
२ नोव्हेंबर रोजी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य केले. “पंतप्रधान मोदीजी, भारतीयांशी खोटे बोलणे थांबवा, तुम्ही परकीय मदतीमुळेच पंतप्रधान झालात आणि आजही त्याच जोरावर पदावर आहात,” असा दावा त्यांनी केला. तसेच “देशाची अर्थव्यवस्था आणि परदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुमच्या बाजूने उभे राहून नियंत्रण ठेवतात,” असा आरोप करत त्यांनी मोदींना कोणत्याही व्यासपीठावर खुल्या चर्चेचे आव्हान दिले.
‘लूज कॉन आर्टिस्ट’: भाजपचा पलटवार
राहुल गांधींच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी जोरदार हल्ला चढवला. “राहुल गांधी हे इतके ‘लूज कॉन आर्टिस्ट’ आहेत की त्यांचे तिसऱ्या दर्जाचे खोटे दावे नेहमीच त्यांच्यावर उलटतात आणि शेवटी त्यांचीच फजिती होते,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
२०२३ मधील लंडन दौऱ्याची आठवण
केसवन यांनी राहुल गांधी यांच्या २०२३ मधील लंडन दौऱ्यातील वक्तव्याचा संदर्भ देत त्यांना घेरले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लंडनमध्ये बोलताना, “ही केवळ भारताची लढाई नाही,” असे विधान करत राहुल गांधींनीच भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये परकीय हस्तक्षेपाची मागणी केली होती, याची आठवण भाजपाने करून दिली. राहुल गांधींचे दावे दिशाभूल करणारे असल्याचा आरोप त्यांनी केला.
जॉर्ज सोरोस आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवरून काँग्रेसवर टिका
केसवन यांनी केवळ राहुल गांधींवरच नव्हे, तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरही प्रश्न उपस्थित केले. ‘फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन द एशिया-पॅसिफिक’ (FDL-AP) या संस्थेच्या सह-अध्यक्षपदी सोनिया गांधी कार्यरत होत्या. या संस्थेने स्वतंत्र काश्मीरच्या कल्पनेला पाठिंबा दिला होता आणि तिचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध होते, असा दावा करत केसवन यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर बोट ठेवले. तसेच, हिंडेनबर्ग आणि कॉर्नेलिया वोल यांसारख्या सोरोस यांच्याशी जोडलेल्या संस्थांबाबत काँग्रेस पक्षाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
परदेश दौऱ्यांतील गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह
राहुल गांधींच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांवरही भाजपाने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत टीका केली. “राहुल गांधी अचानक परदेशात का जातात? ते तिथे गुप्तपणे कोणाला भेटतात आणि या बैठकांमागचा अजेंडा काय असतो? लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या दौऱ्यांमधील ही गोपनीयता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे,” असे सांगत केसवन यांनी यावर राहुल गांधींनी देशाला उत्तर द्यावे, अशी मागणी केली.
या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपाच्या या टीकेवर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
