राज्यसभेतले अनेक खासदार निवृत्त होणार आहेत. या दरम्यान काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाषण केलं. या भाषणाची चर्चा होते आहे. कारण देवेगौडांचा उल्लेख करत खरगे यांनी जे म्हटलं त्यावरुन मोदींनाही खळखळून हसू आलं.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले ५४ वर्षांच्या संसदीय कामकाजाचा अनुभव असला तरीही शिकण्याची गरज असतेच. कुठलाही माणूस सर्वज्ञानी नसतो. संसदीय आयुष्यात कटू आणि गोड अनुभव येत असतात. जे सहकारी निवृ्त होत आहेत त्यातले काही लोक जर परतले तर राज्यसभेला आणखी अनुभवी सदस्यांचं योगदान मिळेल. यानंतर खरगे यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा उल्लेख केला.
देवेगौडांबाबत काय म्हटलं आहे मल्लिकार्जुन खरगेंनी?
मल्लिकार्जुन खरगेंनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा उल्लेख केला. ते हलक्या-फुलक्या अंदाजात म्हणाले ५४ वर्षांपासून मी देवेगौडा यांना ओळखतो आधी ते आमच्या बरोबरच होते. त्यानंतर ते आमच्यापासून दूर झाले. हे म्हणजे असं झालं की प्रेम आमच्यावर केलं आणि लग्न मोदींशी. (“मोहब्बत हमारे साथ की और शादी मोदी जी से कर ली”) असं ते म्हणाले आणि सगळ्यांनाच हसू आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हे वाक्य ऐकून हसू आवरलं नाही.
रामदास आठवलेंचंही नाव घेत काय म्हणाले खरगे?
मल्लिकार्जुन खरगे यांनी रामदास आठवलेंचंही नाव घेतलं. ते म्हणाले आपल्या राज्यसभेत रामदास आठवले हे त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या खास कविता खूप चांगल्या असतात. अनेकदा ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही कविता करतात. तसंच त्यांनी त्यांचे सहकारी नीरज डांगी यांचंही कौतुक केलं. नीरज डांगी यांनी कायमच ज्वलंत प्रश्न मांडण्यात आमची साथ दिली. नीरज डांगी आता निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांची आठवण आम्हाला नक्की येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज्यसभेतल्या ३७ खासदारांचा कार्यकाळ संपतो आहे
राज्यसभेतल्या ३७ खासदारांचा कार्यकाळ संपतो आहे. आज त्यांच्या निरोपाची भाषणं झाली. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषणही चर्चेत राहिलं तसंच मल्लिकार्जुन खरगेंचं भाषणही चर्चेत राहिलं. त्यांनी देवेगौडांबाबत केलेल्या उल्लेखानंतर सभागृहाला हसू आवरलं नाही. पंतप्रधान मोदीही दिलखुलासपणे हसले.
