बलात्काराच्या अफवेनंतर पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत विद्यापीठात तोडफोड आणि जोळपोळ केली तसेच, विद्यापीठाच्या आसपास देखील हिंसाचार पाहायला मिळाला. पोलिसांनी या याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, या हिंसक आंदोलनानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी याप्रकरणी पोलिसांनी या घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे.

LPU मध्ये बाहेरचे लोक घुसल्याचा दिपकेंचा दावा

बाहेरील लोक विद्यापीठात घुसले आणि गोंधळ केला असा दावा दीपकेंनी केला आहे. “अनेकजण विद्यार्थ्यांना दोष देत आहेत पण, बाहेरील लोक एलपीयुमध्ये घुसले आणि परिसरात गोंधळ घातला,” असा दावा दिपकेंनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत केला आहे. “बाहेरील लोक विद्यापीठात घुसून गोंधळ कसा करु शकतात?”, असा सवाल दिपकेंनी या पोस्टमधून उपस्थित केला आहे. “विद्यापीठात येणाऱ्या बाहेरच्यांमुळे असुरक्षित आणि भीती वाटत असल्याचे मत अनेक विद्यार्थिनींनी मांडले आहे,” असे दिपकेंनी पोस्टमधून दावा केला आहे.

पोलिसांकडे तपासाची मागणी

घटनेमागील सत्य समोर आणण्यासाठी पंजाब पोलिसांनी तपास करण्याची मागणी दिपकेंनी केलीय. “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अजिबात तडजोड केली जाऊ शकत नाही. पंजाब पोलिसांनी या घटनेचा तपास करुन असं का घडलं याचे सत्य समोर आणणे आवश्यक आहे,” असे दिपकेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दिपकेंनी पोस्टमध्ये चॅटिंगचा एक स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. यात बाहेरचे विद्यापीठात घुसल्याचा दावा केला आहे. शिवाय विद्यापीठाचे गेट तुटले असून, सुरक्षा रक्षक देखील काही करत नसल्याचा आरोप केला आहे.

गुन्हा दाखल, परिस्थिती नियंत्रणात

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची अफवा पसरल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत विद्यापीठातही तोडफोड आणि जाळपोळ केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या वाहनांचे देखील नुकसान करत दगडफेकही केली. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विद्यापीठाने कशी घटना घडल्याचे नाकारले आहे. शिवाय वसतिगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींनी देखील अशी घटना घडली नसल्याचे म्हटले आहे. तसेच, सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.